मधुर कुलकर्णी
भाग – 1
रुंजी टिफिन घ्यायला किचनमध्ये आली आणि उमा तिच्याकडे बघून म्हणाली, “रुंजी, अग हा युनिफॉर्म घेऊन फक्त सहा महिने झाले आहेत आणि हा देखील तुला आता होत नाही. काय करावं तुझं कळतच नाही. वजन कमी कर ग बाई! सायकलिंग करत जा, पोहायला जा म्हणून किती तुझ्या मागे लागायचं… नुसतं खाणं आणि झोपणं!”
आईने परत खाणं काढलं तसं रुंजीचे डोळे भरून आले. “उमा, का तिला शाळेत निघताना बोलतेस? असते एखाद्याच्या शरीराची ठेवण! …आणि सारखं तिचं खाणं काढत जाऊ नको. मला आवडत नाही. रुंजी, ये राजा, डोळे पूस.” उषाताईंनी रुंजीला जवळ घेतलं. आजीचा तो मायेचा स्पर्श झाल्याबरोबर रुंजीला हुंदका आला. रुंजीचा रडवेला चेहरा बघून उमाला कसंतरी झालं. ती रुंजीजवळ आली आणि तिचा हात हातात घेणार इतक्यात रुंजीने तिला दूर लोटलं आणि टिफिन घेऊन घराबाहेर पडली.
“उमा, असं सारखं सारखं तिच्या लठ्ठ शरीरावरून तिला टोकणं बरं नव्हे.”
“आई, मला तिची काळजी वाटते. मुलीची जात आहे. ही अशीच राहिली तर हिचं लग्न होणं अवघडच आहे.”
“उमा, काय तुझं हे वेड्यासारखं बोलणं! आत्ता कुठे ती नववीत आहे. इतका पुढचा विचार कशासाठी? आणि ती सोमेशवर गेली आहे, तिच्या बाबांवर! सोमेश लहानपणी असाच लठ्ठ होता…”
“चुकलंच माझं! पोर रडत शाळेत गेली.” उमा हळहळली.
“संध्याकाळी तिच्या आवडीचं खायला कर, म्हणजे तिची कळी खुलेल.”
रुंजी सुजलेले लाल डोळे घेऊनच शाळेत गेली. डोक्यात विचारांचा नुसता भुंगा! आई हल्ली सतत लठ्ठपणावरून टोकत होती. आज तिच्या शरीराचा तिला अगदी राग राग आला. देवाला मीच दिसली का असं बेढब करायला? माझ्या या शरीरामुळे मला सारखी भूक लागते, त्याला मी तरी काय करू? माझ्या वर्गातल्या नेहा, समीरा आणि इतर मुली किती बारीक आहेत. सगळ्याच सुंदर दिसतात. आजी म्हणते की, माझ्या नातीसारखी गुलाबी नितळ त्वचा, तिच्यासारखे सोनेरी केस आणि लोभस चेहरा कोणाचाच नाही. पण मला आता असं वाटतंय की, माझ्या लठ्ठ शरीराचा मला त्रास होतो, म्हणून ती हे सगळं खोटं बोलते…
हेही वाचा – पुरस्कार… एक नवा हुरूप देणारा!
रुंजी शाळेच्या गेटमधून आत आली आणि तिला तिच्या वर्गातल्या मुलांचा घोळका दिसला. ही सगळी आगाऊ मुलं सतत चिडवत असतात. आता पुढच्या वर्षी दहावी झाली की, या सगळ्यांची परत तोंडं सुद्धा दिसायला नको. ती खाली मान घालून चालायला लागली. इतक्यात तिला ऐकू आलं… “रुंजी रुंजी, फुगलेली करंजी.” हा नक्कीच भार्गव असणार. तिने रागाने वळून बघितलं. भार्गव तिच्याकडे बघून जोरजोरात हसत होता आणि त्याच्याबरोबर इतरही मुलं हसत होती. परत डोळे भरून यायला लागले. ती धावतच वर्गाकडे जायला निघाली. शाळेत आज दिवसभर लक्षच लागत नव्हतं. मधेच डोळे भरून येत होते…
रुंजीने घरात पाऊल टाकल्यावर तिला बटाटेवड्याचा खमंग वास आली. कधी ते वडे खाते, असं तिला झालं,पण सकाळचं आईचं बोलणं आठवलं आणि ती मुकाट्याने दप्तर घेऊन खोलीत गेली. तिचा हिरमुसला चेहरा बघून आजी म्हणाली, “रुंजी, आज आईने खायला काय केलं माहिती आहे का? जा, पटकन हात-पाय धुऊन ये.”
“आजी, मला काहीही खायला नको. भूक नाही.”
“अग, भूक कशी नाही? रोज आल्यावर तुला खायला हवं असतं आणि आज हे काय?”
“हो, पण आज भूक नाही.” रुंजीने दप्तर टेबलवर टाकलं आणि फ्रेश व्हायला गेली.
रुंजीचं असं नाराज होणं, उमाच्या मनाला टोचून गेलं. रुंजीला डॉक्टरकडे न्यायचं तिने ठरवलं.
“सोमेश, मी आज संध्याकाळी रुंजीला माझ्या एका मैत्रिणीकडे घेऊन जाते आहे. ती डॉक्टर आहेच, पण डाएटिशिअन पण आहे. ती काहीतरी मार्गदर्शन करेल.”
“डॉक्टरकडे जा तू, पण रुंजीच्या लठ्ठपणाचा तू फार बाऊ करते आहेस. लहान आहे ती अजून! काही दिवसांनी बघ, माझी रुंजी हजार जणीत उठून दिसेल.”
“ती आहेच रे देखणी! पण हे शरीराचं बोजड होणं योग्य नाही. वेळीच आवर घालायला हवा.”
उमाने रुंजीला डॉक्टरकडे नेऊन आणलं. डॉक्टरांनी तिला काही डाएट टिप्स दिल्या आणि त्या न चुकता पाळायला सांगितल्या. रुंजी नाराजीने का होईना, ते सगळं पाळत होती.
दहावीचं वर्ष आलं! शाळेच्या पहिल्या दिवशी रुंजीने बघितलं तर सगळ्याच मुली तिला बदलल्यासारख्या वाटल्या. दोन महिन्यांत इतका बदल होऊ शकतो? बऱ्याच जणींनी हेअरस्टाईल बदलली होती. काहींनी भुवया कोरल्या होत्या. मुलं पण वेगळीच दिसत होती. ओठांवर कोवळी मिसरूड, बेदरकार नजर… आणि भार्गव तर…! रुंजीला भार्गवकडे बघत राहावंसं वाटलं. त्याने पण भांगाची स्टाईल बदलली होती. मधला भांग पाडून त्याचे घनदाट केस मागे वळवले होते. आणि उंच किती झाला होता. ती भार्गवकडे टक लावून बघत असताना भार्गवने तिला हाक मारली, “रुंजी, काय केलंस सुट्टीत? तू कुठल्यातरी डाएटीशिअनचा सल्ला घे. दहावीचे वर्ष आहे. या लठ्ठपणामुळे तुझ्यात अभ्यासाला एनर्जी कमी पडेल.”
“अं, हो हो…” रुंजी भानावर आली. तिने बघितलं तर भार्गव समीराशी बोलण्यात मश्गुल झाला होता. समीरा किती सुंदर दिसत होती. स्टेपकट केला होता आणि तिचा कमनीय बांधा बघत रहावा असा! रुंजीला परत न्यूनगंडाने पछाडलं. भार्गवचा प्रचंड राग आला. याला माझ्या लठ्ठपणा व्यतिरिक्त दुसरं काही बोलता येत नाही का? एरवीही तो बोलायचा पण फक्त अभ्यास, नोट्स यावरच! त्या समीराशी जसा इतर विषयांवर बोलायचा, तसं कधीच बोलत नव्हता.
डॉक्टरांच्या सल्ल्याने रुंजी डाएट घेत होती, पण म्हणावा तसा तिच्यात फरक पडत नव्हता. दोन-तीन किलो वजन कमी झालं तेवढंच! तिने तो विचारच डोक्यातून काढून टाकला आणि जोमाने बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. भार्गवचं समीराशी सतत बोलणं, इतर मुलींचं दिसणं, वागणं हे तिने डोक्यातून काढून टाकलं. तिच्या श्रमाचं चीज झालं. रुंजी 98% मार्क्स मिळवून बोर्डात दुसरी आली. तिच्या यशाचा शाळेत खूप जल्लोष झाला. भार्गवला 94% मिळाले होते आणि समीराला 75%. भार्गवने रुंजीला एक कॅडबरी देऊन तिचं कौतुक केलं. भार्गवला बघितल्यावर रुंजीच्या मनात चलबिचल झाली, पण तिने स्वतःला सावरलं.
घरी तर उमा, सोमेश आणि आजीला रुंजीला कुठे ठेवू आणि कुठे नको, असं झालं होतं…
“रुंजी, आज अनिता घरी येतेय तुला भेटायला!”
“कोण अनिता?”
“अगं, असं काय करतेस? भार्गवची आई. तिला तुझा निकाल कळल्यावर मला फोन आला की, रुंजीला भेटायला येते. तिला प्रत्यक्ष भेटून तुझं कौतुक करायचं आहे.”
रुंजी एक क्षण हरखली, पण लगेच म्हणाली, “माझ्या मार्कांबद्दल बोलायचं असेल, तरच मी मावशीशी बोलेन. माझ्या शरीरावरून मला कोणाचेही आता ऐकून घ्यायचे नाही.”
“अग, तुझं अभिनंदन करण्यासाठीच ती येतेय न!”
रुंजीने कॉमर्सला ॲडमिशन घेतली. तिला सीए व्हायचं होतं. भार्गव आणि समीराने सायन्सला ॲडमिशन घेतली. रुंजीला हायसं वाटलं. भार्गवशी आता संपर्कच येणार नव्हता. कॉलेज लाइफ सुरू झालं. रुंजीचा अभ्यास, तिची मेहनत सगळंच तिने पणाला लावलं आणि बारावीत तर उत्तम मार्क्स मिळवलेच, पण सीए एन्ट्रन्स पण पास झाली. बी कॉमबरोबर तिचा सीएचा अभ्यास सुरूच होता. तारुण्यात पदार्पण केलेल्या रुंजीला आपल्या सौंदर्याची जाणीव व्हायला लागली. इतकी नितळ त्वचा, सुंदर केस, इतके रेखीव फीचर्स, उंची… तिला कॉलेजमध्ये कुठल्याच मुलीत दिसत नव्हतं. अभ्यासाच्या श्रमाने लठ्ठपणा थोडा कमी झालाच होता, पण रुंजीने जिम देखील जॉइन केलं आणि दोन महिन्यांत तिचा कायापालट झाला. तिचा लठ्ठपणा नावालाही राहिला नव्हता. तिच्यात प्रचंड आत्मविश्वास आला. बुद्धीचं तेज चेहऱ्यावर होतंच!
कॉलेजमध्ये नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले होते. पण रुंजीला सतत भार्गवची आठवण यायची. त्याला फोन करून भेटावं असं वाटायचं. पण दुसरं मन म्हणायचं, त्याला तरी कुठे आठवण आहे? मग ती विचार झटकून टाकायची.
सीएच्या फायनल परीक्षेच्या शेवटल्या पेपरला जात असताना रुंजीला सिग्नलवर अचानक “रुंजी!” अशी हाक ऐकू आली. तिने आजूबाजूला बघितलं. एक हँडसम गॉगल लावलेला मुलगा तिला हाक मारत होता. ती कावरीबावरी झाली आणि सिग्नल सुटल्यावर गाडी फास्ट केली.
पेपर देऊन रुंजी एक्झाम हॉलमधून बाहेर आली तर तोच मुलगा गेटपाशी उभा होता. हा इतका वेळ इथे उभा आहे,? कोण असेल हा? तिने स्कूटर स्टॅण्डवरून काढली आणि ती जायला निघाली. इतक्यात तो मुलगा जवळ आला. त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला. रुंजीने बघितलं आणि ती अवाक् झाली… तो भार्गव होता!
“अशी काय बघतेस? ओळख नसल्यासारखी?”
“खूप दिवसांनी तुला बघते आहे नं! नाही ओळखलं. कसा आहेस?”
“मी मजेत! तुझा पेपर कसा गेला?”
“पेपर छान गेला.”
“रुंजी, तुला माझ्याबद्दल मित्र-मैत्रिणींकडून मी काय करतो ते कळलंच असेल. तुला एकदाही मला भेटावसं नाही वाटलं?”
“हो, माहिती आहे. तू मेकॅनिकलच्या शेवटच्या वर्षाला आहेस. तुला देखील मी काय करतेय, हे कळलंच असेल. तू तरी कुठे भेटायचा प्रयत्न केलास?”
“आता मात्र हद्द झाली हं रुंजी! मला सोमेशकाका एकदा मेडिकल शॉपमध्ये भेटले होते. त्यांना मी सांगितलं, मी रुंजीला भेटायला घरी येईन. काका तुला बोलले नाही का?”
“बाबा विसरले असतील. पण तू यायचं होतंस ना!”
“यावसं तर वाटलं होतं, पण तुला आवडेल की नाही, हा विचार मनात आला. शाळा संपल्यानंतर आपल्या दोघांची भेटच नव्हती. आई आणि उमामावशी भेटत असतात. एनीवे, पण तुझ्यात खूप बदल झाला आहे. ब्युटीफुल गर्ल!”
“आता कृपा करून कुरूप बदकाचं राजहंसात रूपांतर झालं वगैरे, असल्या उपमा देऊ नकोस. मी कुरूप कधीच नव्हते. तुझ्या डोळ्यांना ते दिसत नव्हतं.” रुंजी रागातच बोलली आणि स्कूटर स्टार्ट करून निघाली.
“रुंजी…” भार्गवला पुढचं बोलायला रुंजीने चान्सच दिला नाही. स्कूटरमुळे डोळ्यात गेलेली धूळ पुसत भार्गवने मोटरसायकल सुरू केली. तो गेटच्या बाहेर आला आणि काही अंतरावर त्याला गर्दी दिसली. त्याने मोटरसायकल पार्क केली आणि बघायला गेला. लोकांना बाजूला करत त्याने बघितलं, रुंजी स्कूटरवरून पडली होती. तिच्या उजव्या पायावर स्कुटर पडली होती. लोकं स्कूटर उचलत होते. तो धावत आला आणि त्याने रुंजीला दोन्ही हातांनी उचललं.
हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!
एका मुलाला रुंजीची स्कूटर बाजूला पार्क करायला सांगून, त्याने रिक्षेला हात केला. रुंजीला त्याने रिक्षेत बसवलं आणि तिचा पाय आपल्या मांडीवर घेत, तिच्या बाजूला बसत रिक्षेवाल्याला दवाखान्याचा पत्ता सांगितला. रुंजी वेदनेने विव्हळत होती. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिचा ताण कमी करावा म्हणून भार्गव म्हणाला, “तरी नशीब, शाळेतली रुंजी नाही, नाहीतर तुला उचलणं मला अवघडच होतं.”
भार्गवचं ते बोलणं ऐकलं आणि रुंजी हुंदके देऊन रडायला लागली.
“ए रुंजी, करंजी, मी चेष्टा करतोय.”
“तू आजपर्यंत तेच करत आला आहेस. का सारखा माझी खिल्ली उडवतोस? तू उतर रिक्षेतून. मी मॅनेज करेन. मी काही लहान नाही.” रुंजी रागाने म्हणाली.
“तू लहान नाहीस म्हणूनच तर तुझी काळजी वाटते गं! इतकी सुंदर मुलगी कोणी पळवून नेली तर?”
रिक्षेवाल्याने ते ऐकलं आणि म्हणाला, “काय साहेब, चेष्टा करता का गरीबाची? विश्वास नसेल तर दुसरा रिक्षा बघा.”
“सॉरी दादा, तुम्हाला नाही म्हटलं. मी सहज हिचा ताण कमी करण्यासाठी बोललो.”
क्रमश:

