Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज
    शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 10, 2026Updated:March 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नाट्यकलावंतांचा शोध, शाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध, नाट्यकर्मींचा शोध, विद्यार्थ्यांमधील अभिनय गुण, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, विद्यार्थ्यांमधील अभिनय कौशल्य, विद्यार्थ्यांच्या अभिनय गुणाला प्रोत्साहन, विद्यार्थ्यांची नाटकाची आवड, विद्यार्थ्यांची अभिनयाची आवड,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. किशोर महाबळ

    स्नेहसंमेलनाचे दिवस आले की, शिक्षक सहसा शाळेतील नेहमीच नाटकात भाग घेणारे विद्यार्थी घेऊन दोन-चार नाटके बसविण्याची तयारी सुरू करतात. अगदीच नाईलाज झाला तर, काही नवे कलाकार शोधले जातात. बहुतांश विद्यार्थ्यांना नाटकात भाग घेताच येणार नाही, असा सहसा शिक्षकांचा समज असतो. खरेतर, अनेक वर्ग असलेल्या प्रत्येक शाळेत बरेच विद्यार्थी नाटकात भाग घेण्याच्या योग्यतेचे असतील, पण असा शोधच घेतला जात नसल्याने नवे कलाकार सापडत नाहीत आणि त्यामुळेच सर्व विद्यार्थ्याना नाटकात भाग घेण्याची कधीच संधी मिळत नाही. अशी संधी देण्याचा प्रयत्नही होत नाही. बहुतांश विद्यार्थी हे नाटकात भाग घेण्याच्या अनुभवाला मुकतात. काही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच उत्तम नाट्यकलाकार होण्याचे गुण असतात, हे आपण मान्य करतोच आणि त्यामुळे त्यांना संधी मिळावी, हे बरोबरच आहे. पण नाटक हे शिक्षणाचे एक उत्तम माध्यम आहे, हे आधुनिक शिक्षणशास्त्रात मान्य झाले असल्याने या माध्यमाचा परिचय सर्वच विद्यार्थ्यांना होणे, हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.

    नाट्यकलाकार हा नाटकातील भूमिकेनुसार त्या व्यक्तिसारखे हावभाव करतो, कृती करतो हे प्रत्येक नाटकात असतेच हे जर आपण मानले तर, आपल्याला अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळतील. आपण बारकाईने निरीक्षण केले तर, अगदी लहान वयापासूनच कुणाच्या तरी वागण्याचे अनुकरण केले जाते, हे आपल्या लक्षात येईल. लहान मुलांचे वर्तन, भावना व्यक्त करण्याची पद्धत, अनेकदा अगदी त्यांच्या आईवडिलांसारखी असते. हे नकळत झालेले असते आणि होत राहते. ही अनुकरणाची सवय पुढेही सुरूच राहते. आवडणारे शिक्षक आणि नातेवाईक, प्रभावित करणाऱ्या व्यक्ती यांचे अगदी नकळत अनुकरण करण्याचा प्रयत्न व्यक्ती करू लागते. असे होणे नैसर्गिकच मानले पाहिजे. मोठेपणीही अनेकदा प्रभावित करणाऱ्या व्यक्तीसारखे वर्तन एखादी व्यक्ती अगदी नकळत करते, हे आपण नेहमीच बघतो. आपलेही वर्तन जर आपण बारकाईने तपासले तर, आपले विशिष्ट प्रकारचे वर्तन हे कोणाचे अनुकरण आहे, हे आपल्याला बहुतेक वेळी सहजच लक्षात येऊ शकते.

    नाटकातील भूमिकेनुसार त्या व्यक्तीसारखे तंतोतंत आचरण करणे, हा नाटकाचा एक भाग असतो, असा जर आपण विचार केला तर आपण सर्वच जण नकळत, काही प्रमाणात रोज नाटक, नक्कल करत असतो, हे आपल्या सहज लक्षात येईल. मोठी माणसेही भावभावना व्यक्त करतांना अनेकदा त्यांच्या खऱ्या भावभावनांना लपवित असतात आणि खोटे वर्तन करीत असतात. तेही नाटकच असते. तात्पर्य हे की, आपण नाटकाचे काही पैलू सहजगत्या आचरणातून दाखवित असतो. असे असले तरीही एक बाब मात्र लक्षात ठेवली पाहिजे की, आपण कोणासारखी कृती करणे म्हणजेच फक्त नाटक नव्हे. नाट्यकला हा एक खूप मोठा विषय आहे.

    हेही वाचा – Education : उत्तम संगीताचे संस्कार

    नाटकात भाग घेणे, हे व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असते, हे आता शैक्षणिक मानसशास्त्रात तसेच शिक्षणशास्त्रात सर्वमान्य झाले आहे. अभ्यासकांच्या मते नाटकाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रबोधन, प्रोत्साहन आणि प्रशिक्षण करता येऊ शकते. जे पुस्तकांद्वारे शिकविता येऊ शकत नाही, तेही नाटकाद्वारे शिकविता येते, हे लक्षात आल्याने जगातील नामवंत शिक्षण संस्था, नाटक या माध्यमाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात भरपूर उपयोग करतात. विद्यार्थ्यांनी नाटकात भाग घेतल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो, विविध समाज घटकांतील व्यक्तिरेखांची भूमिका सादर करताना, त्या त्या समाजघटकांतील व्यक्तींच्या समस्या, प्रश्न, भावभावना समजून घेण्याची संधी मिळते. त्यांच्याबद्दल सहानुभूतीने विचार करण्याचे महत्त्व कळते. तसेच, सामाजिक जाण विकसित होते. नेहमीच्या शिक्षणात बहुधा ऐकणे, वाचणे यावर भर दिला जातो. पण नाटकात मात्र याशिवाय कृतीवर, सादरीकरणावर भर दिला जातो. यामुळे विद्यार्थी अधिक उत्तमरित्या शिक्षण घेऊ शकतात. नाटकातील दर्जेदार भाषा पाठ करावी लागत असल्याने पाठांतराची क्षमता वाढते. विविध भूमिका सक्षमपणे सादर करण्यासाठी भरपूर विचार आणि अभ्यास करावा लागतो. त्या भूमिकेसंबंधी असंख्य गोष्टी समजून घ्याव्या लागतात. याशिवाय, या भूमिका करताना कल्पनाशक्तीचा विकास होतो. कल्पनाशक्ती ही व्यक्तिगत जीवनातील समस्यापूर्तीसाठीही उपयोगी ठरते. नाटकात भूमिका करताना इतरांबरोबर सहकार्य करण्याची, सुसंवाद राखून कार्य करण्याची, जबाबदारीने वागण्याची, वेळेचे नियोजन करण्याची सवय लागते. याशिवाय संवाद कौशल्ये शिकता येतात. ही कौशल्ये जीवनात उपयोगी पडतात.

    गाणी, नृत्य यांचाही समावेश असलेल्या नाटकात भाग घेतल्याने या कलाही शिकता येतात. नाटकात कधी प्रमुख भूमिका करायला मिळते तर, कधी एकदम छोटी कमी महत्त्वाची भूमिका मिळते. यामुळे कोणतीही भूमिका करण्यास सारखेच महत्त्व देण्याची सवय लागते. नाटकात भाग घेतल्याने नकारात्मक भावनांना सकारात्मक भावनांमध्ये परिवर्तीत करता येते. आत्मसन्मान आणि स्वत:बद्दल सकारात्मक भावना विकसित होते. हे सारे फायदे लक्षात घेतले तर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला नाटकात भाग घेण्याची संधी मिळालीच पाहिजे, हे आपल्या लक्षात येईल. सर्व विद्यार्थ्यांना अशी संधी मिळाली तर, ज्या विद्यार्थ्यांमध्ये नाटकात काम करण्यासाठी आवश्यक ते गुण सुप्त रूपात असतील ते यामुळे व्यक्त होतील, ज्यांच्यात हे गुण असतील त्यांना ते अभिव्यक्त करण्याची संधी मिळेल. इतर सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने नाटकाबद्दलचे प्राथमिक स्वरूपाचे का होईना ज्ञान होईल आणि व्यासपीठावर येऊन नाटक सादर केल्याने आत्मविश्वास तर निश्चितच वाढेल.

    नाटक सादर करणे सोपे नाही. नाटकाची निवड करणे, त्यातील प्रत्येक भूमिकेसाठी योग्य कलाकार शोधणे, आवश्यक असल्यास त्याला प्रशिक्षण देणे, सर्व कलाकारांच्या तालमी घेणे, दिग्दर्शन करणे, सर्व कलाकार भूमिकेला अनुसरून नाटक सादर करतील इतकी त्यांची तयारी करून घेणे या सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर जिथे नाटक सादर केले जाणार असेल, त्या रंगमंचासाठी योग्य त्या रंगाचे पडदे, टेबल, खुर्च्या यासारख्या आवश्यक असलेल्या वस्तू मिळविणे, ध्वनिक्षेपकाची सोय करणे, प्रकाशयोजना करणे, कलावंतांना बसण्याची, फिरण्याची सोय, ध्वनीक्षेपक, आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण करण्यासाठी वाद्यवादकांची बसण्याची सोय, वेगवेगळ्या भूमिकेनुसार कलाकारांसाठी विविध प्रकारचे वेष मिळविणे अशा अक्षरशः असंख्य गोष्टी कराव्या लागतात. भरपूर खर्चही करावा लागतो. हे करणे स्नेहसंमेलनातच शक्य असल्याने तेव्हाच नाटक सादर करण्याचा शिक्षक विचार करतात आणि तो बरोबरही आहे. अशी जास्तीत जास्त चार-पाच नाटके स्नेहसंमेलनात होऊ शकतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त पंचवीस ते तीस विद्यार्थ्याना नाटकात भाग घेण्याची संधी मिळू शकते. या नाट्यप्रकारातून शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना नाटकात भाग घेण्याची संधी देणे अशक्य आहे. कारण, असा प्रयत्न हा वेळखाऊ, खर्चिक आणि अशक्य आहे, असे शिक्षकांना वाटले तर, ते बरोबरच आहे. मात्र एक वेगळा नाट्यप्रकार जर आपण स्वीकारला तर, आपली समस्या सुटू शकते हेही तेवढेच खरे.

    हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!

    पथनाट्य हा नाटकाचा एक अभिनव प्रकार आहे. त्यात कितीही कलाकारांचा समावेश करता येऊ शकतो आणि उंच व्यासपीठ, पडदे, विविध वेशभूषा यांची काहीच आवश्यकता नसते. ते कुठेही कमीतकमी खर्चात सादर करता येते. त्यात कथा असते, गाणी असतात, ती सर्व कलाकार म्हणत असल्याने सर्वांना ऐकू येतात त्यामुळे छोटा ध्वनिक्षेपकही पुरेसा असतो. प्रकाशयोजनेची विशेष व्यवस्था करावी लागत नाही. वाद्ये असली किंवा नसली तरीही ते सादर करता येऊ शकते. पथनाट्यातील भाषा अतिशय सोपी असते. संवाद विनोदी, चटकदार भाषेत असल्याने कोणाही कलाकाराला ते सहज पाठ करता येतात. कोणत्यातरी सामाजिक प्रश्नावर लोकशिक्षण आणि प्रबोधन करणे हा पथनाट्याचा उद्देश असतो. पथनाट्याच्या माध्यमातून आपण शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना नाटकात भाग घेण्याची संधी देऊ शकतो. शिक्षकांनी थोडेसे प्रशिक्षण घेतले तर पथनाट्य कसे बसवायचे आणि सादर करायचे, हे सहज शिकता येईल. हे शक्य नसेल तर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेता येऊ शकते. याशिवाय, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचीही मदत मिळू शकते. प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट करून कमीतकमी दोन-तीन पथनाट्ये सहज बसविता येऊ शकतात. त्यामुळे वर्गातील सर्वाना नाटकात भाग घेण्याची संधी मिळेल.

    प्रत्येक शाळेत सर्व वर्गांची मिळून अशी कमितकमी 50 ते 60 पथनाट्ये वर्षभरात बसवली जाऊ शकतात. त्यांचे सादरीकरण हा एक मोठा कार्यक्रम होऊ शकतो. अभ्यासक्रमातील विषयांवर किंवा कोणत्याही प्रश्नांवर पथनाट्ये तयार करता येऊ शकतात. पथनाट्यांच्या संहिताही मिळविता येऊ शकतात. कमी खर्चाच्या या नाट्यप्रकाराचा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासात खूप फायदा होऊ शकतो.

    (‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण’ या पुस्तकातून साभार)


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    शिक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली कशी असावी आणि कशी नसावी!

    February 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn