Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»कडक उन्हाच्या झळा अन् माणुसकीचा ओलावा
    ललित

    कडक उन्हाच्या झळा अन् माणुसकीचा ओलावा

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 5, 2025Updated:March 17, 2026No Comments11 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, तहान, तृष्णा, पाणी, देवबा, खानदेशचा उन्हाळा, पाण्याचे दुर्भिक्ष,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    तिकीट काढून देवबा मूर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला, तेव्हा तीन वाजून गेले होते. मे महिन्याची ती दुपार… भयंकर उष्मा होता… अंगाची लाहीलाही होत होती… प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं. गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते. पॅसेंजर लेट झाली होती, तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर, ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच! चमकून त्याने दहा वर्षांच्या नातीकडे पाहिलं… तशी ती म्हणाली,

    “दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी!”

    त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं,

    “व्हय रं बेटा?”

    नातवाने निरागसपणे मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले. आजोबा आता मारतो की काय, अशी भीती दाटून आली. देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला. त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता. ही तर लहान मुलं होती. बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असताना दोघांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता. त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता. देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो  प्लॅटफॉर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला. पण एकाही नळाला थेंबभर पाणी नव्हतं. त्याने समोरच्या प्लॅटफॉर्मवर नजर टाकली. तिथल्या नळांनाही पाणी दिसत नव्हतं. स्टेशन मास्तरच्या ऑफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं,

    “बाबूजी, पाणी हाये का कुठं? लेकरासाठी पाहिजे हुतं.”

    कर्मचाऱ्याने त्याला वरून खाली बघितलं आणि म्हणाला,

    “बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का?”

    देवबाने नकारार्थी मान हलवली.

    “मंग कसं राहीन पाणी? आम्हालेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू? आमीबी बाहेरून मागवतो. जाय त्या कॅन्टिनमधी पाणी हाये…” कॅटीनकडे हात दाखवत तो म्हणाला.

    देवबा तिकडे गेला आणि म्हणाला, “बाबू पाणी हाये का?”

    कॅन्टिनमधल्या माणसाने पटकन फ्रीजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली, “बीस रुपया.”

    “बीस रुपये? नाय. मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी…”

    त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रीजमध्ये ठेवली.

    “खुल्ला नहीं है पानी. बाहर जाओ, होटल में मिल जायेगा…”

    देवबा बाहेर आला. रोडावरच्या हॉटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

    “बाबा चाय पिना है तो पिलो. पानी नहीं मिलेगा. बोतल दे दूं? बीस रुपये की हैं!”

    देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हॉटेलवर गेला… तिथून तिसऱ्या… चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत. पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का? असा प्रश्न त्याला पडला. पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं. शेतकरी माणूस. दोन एकरची कोरडवाहू शेती. शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा. मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले, नद्यानाल्यातलं, जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. अर्थात, देवबाला हे नवीन नव्हतं. असं झालं की, तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा. त्यातून पदरी दोन मुली, मुलगा नाही. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती. मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच. पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती. शाळांना सुट्ट्या लागल्या, तसं भुसावळला राहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं. मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता. खरंतर, देवबालाही त्यांनी राहावं, असं वाटत नव्हतं. पाण्याचा प्रश्न बिकट झालेला. दहा–दहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की, त्यावर मरणाची गर्दी व्हायची… दोन-चार हंडे मिळाले की, टँकर संपून जायचा… तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं. त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची. मग देवबा सायकलवरून आठ किलोमीटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून पाणी आणायचा. पण आता त्याचं वय झालं होतं. तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा…

    हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

    तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला. तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता. नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं,

    “आबा, पाणी नाही मिळालं? दादू परत पाणीपाणी करतोय. मला पण तहान लागलीये…”

    नातवाचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल, या विचाराने देवबा उठला. तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली. सात-आठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला. पण त्या लोकांच्या कपड्यावरून ते मोठ्या घरातील लोक आहेत, हे देवबाच्या लक्षात आलं. कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची वाट बघत असावेत. त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना. ते नाहीच म्हणणार, हे नक्की होतं. सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका माणूस. समोर उभं तरी करतील की नाही, देव जाणे.

    “आबा पाणी पाहिजे…” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करून सांगितलं. त्याने नातवाकडे पाहिलं तर, तोही त्या जारकडे बोट दाखवत होता. आता हिंमत दाखवावीच लागणार होती. त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला. ती माणसं काहीतरी इंग्रजी, मराठीत बोलत होती. देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं. तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला. पण पाणी तर, नेणं गरजेचं होतं. काय करावं, त्याला सुचेना!

    “काय बाबा काय पाहिजे?” कुणीतरी विचारलं.

    “दादा जरा पाणी पाहिजे हुतं. लेकरं लय तहानलीयेत…”

    तो एका माणसाला म्हणाला. तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले. त्यांचंही बरोबरच होतं. अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

    “अरे, तिथे कॅन्टिनमध्ये पाहिजे तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात, तिथून घ्या ना!” एक बाई म्हणाली.

    “बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे. उकळून थंड केलेलं. ते आम्हालाच पुरणार नाही. तुम्हाला कसं देणार?” एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

    “थांबा बाबा…”

    देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता. देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला,

    “अरे, पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर, ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का? आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं पुण्य दुसरं नाही. बाबा किती जण आहात तुम्ही?”

    “तीन जण” तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला. त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला,

    “जा. बाबांना त्या कॅन्टिनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे…”

    देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘आंधळा मागतो एक अन् देव देतो दोन’ अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कॅन्टिनकडे गेला. मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

    “दादा लय उपकार झाले…”

    देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने हसला. देवबा नातवांकडे आला. थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली. त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली. देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

    हेही वाचा – कुंडलीयोग अन् विधिलिखित!

    पॅसेंजर आली. प्रचंड गर्दी होती, पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि नातवांना बसायला जागा मिळाली. खिडकीतून उतरतीचं ऊन अंगावर येत होतं… छताचा पंखा आवाज करत गरम हवा फेकत होता. दोन-तीन स्टेशन्स गेली असावीत देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं. या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही, वारंवार लागते, हे त्याच्या लक्षात आलं. आता विहिरीचं पाणी प्यायलो असतो तर, दोन तास तरी तहान लागली नसती. त्याने मनाला आवर घातला. असं जर वारंवार पाणी प्यायलो तर भुसावळ येण्याच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही, हे त्याला पक्कं ठाऊक होतं. पाण्यासाठी पैसे खर्च करण्याइतका तो नक्कीच श्रीमंत नव्हता. त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते. भुसावळला उतरलं की, मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं, तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मूर्तिजापूर पॅसेंजरचं भाडं, मूर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते. देवबा स्वाभिमानी होता. जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं.

    “आबा पाणी” नातू म्हणाला तशी पिशवीतून एक बाटली काढून त्याच्या हातात देत तो म्हणाला,

    “दादू, आता घोट घोट पाणी पी रे भाऊ. नंतर कुठंच पाणी मिळणार नाही.”

    नातवाने मान डोलावली आणि बाटली तोंडाला लावली. घोट घोट कसलं घटाघटा पाणी पिऊन त्याने ती अर्धी संपवली. त्याचं झाल्यावर नातीने उरलीसुरली बाटलीही संपवून टाकली. देवबाने कपाळावर हात मारून घेतला. खरं म्हणजे, त्यांना पाणी पिताना पाहून त्यालासुद्धा पाणी प्यायची तीव्र इच्छा होत होती. पण कसंबसं त्याने इच्छेला दाबून टाकलं.

    शेगांव आलं तसा कचोरीवाला डब्यात शिरला. “गरम कचोरी, दस में तीन, दस में तीन” त्याच्या सोबतच कचोऱ्यांचा खमंग वास डब्यात शिरला. पोरं आता भुकेली झाली असतील त्यांना कचोरी घेऊन द्यावी का? असा विचार त्याच्या मनात आला खरा, पण आपल्याजवळ फक्त दोनशे रुपये आहेत याच्या जाणीवेने तो चूप बसला.

    “आबा मले कचोरी,” नात म्हणाली. आता नातू चूप थोडीच बसणार होता…

    “आबा मलेबी कचोरी”

    कचोरीवाला आला तसं देवबाने त्याच्याकडून दहा रुपये देऊन तीन कचोऱ्या घेतल्या .तीनही कचोऱ्या त्याने नातीच्या हातात दिल्या. तिने एक भावाला देऊन एक स्वतःकरता ठेवली आणि तिसरी कचोरी देवबासमोर धरली.

    “आबा कचोरी” तिचा समजुतदारपणा पाहून देवबाला हसू आलं. त्याने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.

    “दादूला देजो बेटा. नाहीतर तुम्ही दोघं अर्धीअर्धी खाऊन घेजा…” कचोरी परत करत देवबा म्हणाला. पोरांनी कचोऱ्या खाल्ल्या आणि शेवटच्या बाटलीतलं पाणी अर्ध संपवून टाकलं. नाही म्हणता देवबानेच पाणी अर्ध असताना त्यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतली.

    गाडीने नांदूरा सोडलं तसा देवबा बसल्याबसल्या पेंगायला लागला. खुमगाव बुर्ती गेलं, तशी त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली. एका लहान पोराचा तो रडण्याचा आवाज होता. त्याने डोळे उघडून पाहिलं तर, एका भिकारणीच्या कडेवरचं पोरगं किंचाळत होतं.

    “देरे दादा थोडं पाणी, पोरगं लई कावरंबावरं झालंय तहानेनं. देरे दादा, देवं माय. लई पुण्य मिळेल दादा…”

    भिकारीण गयावया करत होती. लोकांसमोर हात पसरत होती.

    देवबाने समोरच्या प्रवाशांकडे पाहिलं, कुणीच पाणी द्यायला तयार दिसेना. उलट लोक आपापल्या बाटल्या लपवत होते आणि तेही चुकीचं नव्हतं. या प्रचंड उष्म्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना कोण त्या भिकारणीला पाणी देणार होतं?

    “बाबा दे रे पाणी पोऱ्याले…” ती भिकारीण देवबाकडे पाहात म्हणाली. देवबाला त्या पोराचं रडणं सहन होईना. न राहावून त्याने पिशवीतली बाटली काढली. पण हाय रे दैवा. बाटली खिडकीतून येणाऱ्या उन्हाने गरम झाली होती. ते गरम पाणी द्यायला देवबाला बरं वाटेना. तेवढ्यात “पानी बोतल”चा आवाज डब्यात घुमला… आणि पुढच्याच क्षणाला पाणी बोतलवाला समोर उभा राहिला.

    “कित्येकी है बोतल?” देवबाने विचारलं

    “पच्चीसकी”

    “बाहर तो बीस की मिलती…”

    “स्टेशन पे मिलती होगी, गाडी में पच्चीस की है, दूं?”

    देवबा अडखळला. पंचवीस रुपये जास्तच होते. पाणी विकणाऱ्याचा त्याला संताप आला. भिकारणीने त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं. तिच्याकडेवरचं पोरगं रडतच होतं. भिकारणीच्या उजव्या बाजूला त्याच्या नातीच्याच वयाची पोरगी उभी होती. तहानेने तिचाही चेहरा कासावीस झालेला दिसत होता. त्याने निर्णय घेतला.

    “दो. एक दो…” खिशातून शंभरची नोट काढून त्याने पाणीवाल्याला दिली. पाणी वाल्याने एक बाटली काढून भिकारणीच्या हातात दिली. तिने झाकण उघडून कडेवरच्या पोराच्या तोंडाला लावली. तहानलेलं पोरगं घटाघटा पाणी पिऊ लागलं. देवबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं.

    “आबा आपल्यालेबी बाटली घेजो,” नात म्हणाली… तसा देवबा पाणीवाल्याला म्हणाला,

    “और एक बोतल दे दो…”

    भिकारणीच्या कडेवरच्या पोराने अर्ध्याच्या वर बाटली संपवली मगच ते शांत झालं. मग तिच्या पोरीने बाटली घेतली आणि उरलंसुरलं पाणी पिऊन टाकलं.

    “अजून एक बोतल दे रे बाबा. मलेबी लई तहान लागलीये…”

    देवबाने विचार केला आणि पाणीवाल्याला अजून एक बाटली भिकारणीला द्यायला सांगितली

    “बाबा, कहाँ जा रहे हो…” पाणीवाल्याने देवबाला विचारलं.

    “भुसावल…”

    “तो और एक ले लो ना. भुसावल आठ बजे पहुचेगी गाडी. साथ में बच्चे हैं, एक बोतल से थोडेही काम चलेगा!”

    तो बरोबर म्हणतोय, हे देवबाच्या लक्षात आलं. पण फक्त पाण्यासाठी शंभर रुपये खर्च करायचं त्याला मानवत नव्हतं. पण पुढे पाणी नाही मिळालं तर?

    “दे दू बाबा?”

    देवबाला काय उत्तर द्यावं ते कळेना.

    “हां, देऊन टाका” नात मधेच म्हणाली, तशी देवबाच्या उत्तराची वाट न बघता पाणीवाल्याने बाटली देवबाच्या नातीच्या हातात दिली आणि तो निघून गेला. देवबाने खिशातून पैसे काढून पाहिले. फक्त नव्वद रुपये उरले होते. पुढच्या खर्चाचं गणित कसं सोडवावं, हे त्याला कळेना. पण तेवढ्यात त्याला भिकारणीच्या पोराचा पाणी पिऊन त्रुप्त झालेला चेहरा आठवला आणि त्याच्या मनातली रुखरुख कमी झाली.

    मलकापूर गेलं. गाडीतली गर्दी आता कमी झाली होती. सहा वाजत आले होते. जीवाची लाहीलाही करणारा उष्मा आता कमी झाला होता. देवबा विचार करत होता, आता नव्वद रुपयात काहीच होणार नव्हतं. जावयाकडे पैसे मागावेच लागणार होते. जावई श्रीमंत नसला तरी देवबाला पाचशे रुपये सहज देऊ शकला असता. ठीक आहे मनाला पटत नसलं तरी, मागू. आजपर्यंत कधी मागितले नव्हते, आता मागू. पोरीला शरमल्यासारखं होईल. तिला समजावून सांगता येईल आणि आपण तर फक्त उसने मागणार आहोत. घरी गेलो की, पाठवून देऊ परत ते पैसे. पण आज जे मनाला समाधान मिळालं ते काय कमी होतं?’

    “बाबा हे घे तुह्ये पैसे…”

    त्याने चमकून वर पाहिलं. मघाची भिकारीण समोर उभी होती. तिच्या समोर पसरलेल्या हातात एक, दोन, पाच रुपयांची नाणी होती. देवबा आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला. भिकाऱ्याने दिलेली भीक सन्मानाने परत करावी, हे तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता.

    “नको नको. राहू दे…”

    “बाबा तुबी काय पैसेवाला दिसत नाही. पण तुले माणुसकी हाये. घे, भीक मागून जमा केलेत…”

    देवबाला काय करावं सुचेना. पन्नास रुपये घेऊनही त्याला पैसे मागावेच लागणार होते. पण त्याच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याला ते पन्नास रुपयेही कमी नव्हते. त्याची नजर आता समोर बसलेल्या आपल्या नातवाकडे गेली आणि तो भिकारणीला म्हणाला

    “राहू दे बेटा. नातवांना पाणी पाजण्याचे कुणी पैसे घेतं का?”

    “लय मोठ्या मनाचा हाये बाबा तू. देव भलं करो तुह्यं…”

    ती निघून गेली तसा देवबा हसला. भिकाऱ्याच्या आशीर्वादाने तो मालामाल होणार नाही, हे त्यालाही माहीत होतं. पण त्या आशीर्वादामागची खरी भावना त्याच्या ह्रदयाला भिडली होती.

    रात्री आठ वाजता तो भुसावळला उतरला. स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने मुलीसाठी पन्नास रुपयाचं फरसाण घेतलं. तिच्या घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला,

    “चाळीस रुपये,” रिक्षावाला म्हणाला.

    देवबा हसला. थोड्याच वेळात तो कफल्लक होणार होता. पण का कुणास ठाऊक त्याला काळजी वाटत नव्हती. दिवसभरातल्या माणुसकी आणि कृतज्ञतेच्या प्रसंगांनी त्याचं मन भरून गेलं होतं…

    (ही कथा माझ्या ‘गिफ्ट – भेट ह्रदयस्पर्शी कथांची’ या पुस्तकातील आहे.)

    मोबाइल – 9209763049

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn