सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥428॥ मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती । किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥429॥ एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगो किती । जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥430॥ अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । अभिजात्य झणीं श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वाहावा ॥431॥ कां रूपे वयसा माजा । आथिलेपणें कां गाजा । एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥432॥ कणेंविण सोपटें । कणसें लागलीं आथी एक दाटें । काय करावें गोमटें । वोस नगर ॥433॥ नातरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें । कां वांझ फुलीं फुललें । झाड जैसें ॥434॥ तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळजातिगौरव । जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ॥435॥ माझिये भक्तीविण । जळो तें जियालेपण । अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काई ॥436॥ पैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली । तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं । अभक्तांतें ॥437॥ निंब निंबोळियां मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला । तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागीं ॥438॥ कां षड्रस खापरीं वाढिले । वाढूनि चोहटां रात्रीं सांडिले । ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥439॥ तैसें भक्तिहीनाचें जिणें । जो स्वप्नींही परि सुकृत नेणे । तेणे संसारदुःखासि आवंतणें । वोगरिलें गा ॥440॥ म्हणोनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्याहि व्हावें । वरि देहाचेनि नांवें । पशूचेंही लाभो ॥441॥ पाहें पां सावजें हातिरूं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें । कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें । पातलिया मातें ॥442॥
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: । स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥32॥
हेही वाचा – Dnyaneshwari : परिमळु निघालिया पवनापाठीं, मागें वोस फूल राहे देठीं…
अर्थ
ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता, हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो. ॥428॥ मग माझी नित्य असलेली जी स्वरूपशांती, तीच त्याची स्थिती आणि तेज आहे. फार काय सांगावे! माझ्या जीवाने ते जगलेले आहेत. ॥429॥ हे अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन: पुन: तीच ती किती सांगू? माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर, माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस. ॥430॥ अरे, आमचे कुळ शुद्ध आहे, या अभिमानात राहू नका. तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे, असा कदाचित आनंद मानाल, तर मानू नका आणि शास्त्राध्यनाची पोकळ हाव व्यर्थ का बाळगावी? ॥431॥ उत्तम सुस्वरुपाने आणि तारुण्याने मस्त का व्हावे? संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा? (कारण) माझ्याविषयी एक भक्ती नसेल तर, हा सर्व पसारा निष्फळ आहे. ॥432॥ धान्यावाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी आली तरी, त्यांचा काय उपयोग? शहर चांगले आहे, पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग? ॥433॥ अथवा सरोवरातील पाणी आटावे किंवा रानामध्ये एका दु:खी मनुष्याची दुसर्या दु:खी मनुष्याशी गाठ पडावी अथवा एखाद्या झाडाला वांझ फुलांचा बहर यावा, ॥434॥ सर्व ऐश्वर्य अथवा कुळ आणि जाती यांचा डौल हा त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा, ॥435॥ त्याप्रमाणे माझ्या भक्तीवाचून जे जगणे आहे, त्याला आग लागो. अर्जुना, या पृथ्वीवर दगड नाहीत काय? ॥436॥ हिंवराची गर्द छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात, त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकवून पुण्ये निघून जातात. ॥437॥ निंबाच्या झाडाला दाट निंबोण्या आल्या तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो, त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरिताच वाढलेला असतो. ॥438॥ अथवा षड्रसयुक्त अन्न खापरात वाढले आणि ते रात्री चव्हाट्यावर टाकून दिले असता, ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते, ॥439॥ त्याप्रमाणे अभक्त मनुष्याचे जीवित आहे. जो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही, अरे, त्याने संसाराच्या दु:खांना आमंत्रणच वाढून ठेवले आहे. ॥440॥ याकरिता कुळ उत्तमच असावयास पाहिजे, असे नाही. जातीने नीचयोनीचा असला तरी चालेल, (अंत्यजच काय) पण देहाच्या नावाने पशूचा देह मिळाला तरी चालेल. ॥441॥ हे पहा की, मगराने गजेंद्राला (पाण्यात) धरले, त्य़ाच्या तडाख्यातून सुटण्याकरिता त्याने मोठ्या काकुळतीने माझा धावा केला. त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्य़ाचा पशूपणा व्यर्थ गेला. ॥442॥
कारण हे पार्था, माझा आश्रय केल्यावर स्त्रिया, वैश्य, शूद्र, त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म पापयोनीत झाला आहे, असे हे सर्व उत्कृष्ट गतीला पावतात. ॥32॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं सूर्य जो वेळु नुदैजे, तया वेळा कीं रात्रि म्हणिजे…
क्रमश:

