Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»…अन् उरल्या गजऱ्याच्या रुपाने सुमतीताईंच्या स्मृती!
    ललित

    …अन् उरल्या गजऱ्याच्या रुपाने सुमतीताईंच्या स्मृती!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 6, 2026Updated:March 17, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, सुमती नानासाहेब, श्रीधर कुलकर्णी नानासाहेब, सुमतीचा गजरा, सुमतीचा कोमेजणारा गजरा, सुमतीचे गजरावेड, नानासाहेब गजरा, फुलांचा गजरा, सुमतीला अल्झायमर, सुमतीला स्मृतिभ्रंश, सुमतीताईंचा मृत्यू, सुमतीताईंचे गजराप्रेम
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    भाग – 2

    संध्याकाळ झाली तरी नानासाहेब अजूनही हॉलमध्ये खुर्चीवरच बसून होते. सुमतीच्या या अवस्थेला ते स्वतःला जबाबदार मानत होते. त्यांच्या लाडक्या सुमतीला त्यांना या अवस्थेत पाहवले जाणार नव्हते. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. मनाशी काहीतरी निर्धार करून ते उठले आणि बाहेर बगीच्यात आले. सुमतीनेच लावलेली झाडे फुलांच्या भाराने वाकली होती. त्यातील मोगऱ्याच्या काही कळ्या त्यांनी काढून आपल्या ओंजळीत घेतल्या आणि ते सुमतीताईंच्या खोलीत आले. त्या कळ्यांना त्यांनी सुमतीताईंच्या उशाशी ठेवले आणि ते सुमतीताईंच्या उठण्याची वाट पाहू लागले. अर्ध्या तासाने सुमतीताई उठल्या त्या मोगऱ्याचा सुवास आला म्हणूनच. त्यांना आपल्या उशाशी ती मोगऱ्याची फुलं दिसताच त्या आनंदल्या, “अहो, आले का तुम्ही ऑफिसमधून? मला उठवायचे तरी, आणि काय हो, आज सुटीच फुलं आणलीत का? गजरा नाही मिळाला का?” असं बोलून हातात ती फुले घेऊन त्या पटकन बाहेर आल्या.

    त्यांना त्या अवस्थेत पाहून नानासाहेबांना गलबलून आले, ते म्हणाले, “अगं, आज ती गजरेवाली बाईच दिसली नाही बघ, म्हणून मी सुटीच फुलं घेऊन आलो…”

    “काही हरकत नाही, मी करेन हो गजरा, तुम्हाला आवडतो ना, मी गजरा माळलेला! आत्ता करते बघा,” असं म्हणून त्यांनी त्याचा गजरा केला आणि पटकन आरशासमोर बसल्या, आपल्या लांबसडक केसांचा मस्त आंबाडा घालून त्यांनी त्या फुलांचा गजरा केसांमध्ये माळलादेखील! आज एका छोट्याशा कृतीने करामत केली होती. आपण जर असं रोज तिच्याशी वागलो तर, आपल्या सुमतीला आपण परत पूर्वीच्या अवस्थेत आणू शकू, असा विश्वास त्यावेळेस नानासाहेबांना वाटला खरा, पण हा विश्वास थोड्याच वेळात डगमगला. एखाद तासाने सुमतीताई नानासाहेबांना ओळखेनाशा झाल्या! त्यांची स्मृती परत गेली होती… घरातल्या कोणालाच त्या ओळखत नव्हत्या. पण नानासाहेबांनी आशा सोडली नव्हती.

    दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी परत जुईचा गजरा मेघाकडून करवून घेतला, पंडित जसराजजींची अल्हैया बिलावल रागदरी असलेली ऑडिओ लावली, शून्यात पाहात बसलेल्या सुमतीताई ती रेकॉर्डिंग ऐकून थोड्या भानावर येत म्हणाल्या, “किती सुंदर रागदारी आहे, कोण गात आहे बरं?” तेवढ्यात नानासाहेबांनी जुईचा गजरा त्यांच्यासमोर धरला, “अगंबाई, गजरा? अहो तुम्ही केव्हा आलात? मोगरा नाही मिळाला का आज?” नानासाहेबांना ते ऐकून थोडा दिलासा मिळाला खरा, पण सुमतीताई हे सगळं आपल्याच धुंदीत बोलत होत्या… पण गजरा अजूनही त्यांच्या विस्मरणात गेला नव्हता, ही एक जमेची बाजू होती. नानासाहेबांवरच्या अतूट प्रेमाची ती ग्वाही होती.

    त्या दोघांची एकमेकांना किती गरज होती, हे एव्हाना सौमित्र आणि मेघाच्याही लक्षात आले होते. मग त्यांनीपण सुमतीताईंची स्मृती परत आणण्याकरिता माळ्यावरची धूळ खात पडलेला हार्मोनियम खाली काढला, तो दुरुस्त करून आणला, नवीन आणता आला असता, पण ती सुमतीताईंच्या स्मरणातील पेटी असल्यामुळे तिला पाहून कदाचित त्यांच्या आठवणी चाळवल्या गेल्या असत्या म्हणून तीच राहू दिली. स्वरुपाने आजीची अडगळीत पडलेली जुनी डायरी शोधून काढली. आज तीपण आजीला आपल्या जगात परत आणण्याचा प्रयत्न करणार होती. त्यांच्या छोट्या छोट्या आवडीनिवडी आठवून त्यांना विस्मृतीच्या भयाण जगातून बाहेर काढण्याचा त्या चौघांनी चंगच बांधला होता. पण सुमतीताई दिवसेंदिवस अजून भ्रमात चालल्या होत्या. रात्री केव्हाही उठून देवपूजा करायच्या, गेटला लॉक असले तर मोठमोठ्याने सौमित्रला हाका मारायच्या, सकाळी रात्र समजून सगळ्या घरातील दिवे लावून ठेवायच्या, भलत्याच वेळी भाजी आणायला जायचे म्हणून हट्ट करायच्या, मेघासोबत स्वयंपाक करू दे म्हणून हट्ट धरायच्या. तर, कधी-कधी शून्यात एकटक पाहात बसायच्या… घरात आहे की, बाहेर तेदेखील त्यांना कळायचे नाही, अंगावरचे कपडेपण घालायचे भान आताशा त्यांना रहात नव्हते, मेघाला हे सर्व करताना तारेवरची कसरत करावी लागत होती, मदतीला नानासाहेब आणि सौमित्र असायचे, पण कधीकधी सगळ्यांचाच संयम सुटायचा. पण एवढ्या सगळ्या गडबडीत गजरा मात्र कायम त्यांच्या स्मरणात होता. त्या एका उमेदीवरच नानासाहेब रोज आठवणीने घरची फुले मिळाली नाही तर बाहेरुन गजरा विकत आणायचे. डॉक्टरांनाही या गोष्टीच आश्चर्य वाटायचं.

    हेही वाचा – …अन् सुमतीचा ‘गजरा’ हळूहळू कोमेजू लागला!

    एक दिवस सकाळी सकाळी नानासाहेबांच्या कानावर पेटीचे सूर पडले म्हणून ते तडक उठून हॉलमध्ये आले तर सुमतीताई पेटी वाजवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होत्या. ते बिघडलेले सूर ऐकून सौमित्र आणि मेघापण बाहेर आले, पण सुमतीताई आपल्याच नादात काहीतरी वेडवाकडं वाजवत होत्या… आता त्यांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्याला घरातील सगळेच सरावले होते. अशा वेळी त्यांना आटोक्यात आणाण्याचे काम गजरा चपखलपणे करायचा. गजरा दिसला की, त्या शांत व्हायच्या. गजऱ्याची ती फुले आणि सुवास एकाच धाग्यात बांधलेली असल्यामुळे सुमतीताईंची स्मृती त्या गजऱ्यासारखीच गंधीत होऊन थोड्या वेळाकरिता परत येत होती. गजऱ्यातील फुले जशी सुकायची तशी त्यांची स्मृतीदेखील पुसट होत असे…

    कधीकधी त्या भानावर असताना आपल्याला असलेल्या आजारामुळे बाकीच्यांना किती त्रास होतो, हे त्यांना कळायचं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचे. आपल्या बेताल वागण्याने त्या खजिल व्हायच्या, पण विस्मरण झाले की, परत तीच अवस्था व्हायची. सगळेच तसे कंटाळले होते, पण नानासाहेबांची त्यांना बरी करण्याची जिद्द पाहिली की, सगळे परत नव्या जोमाने कामाला लागायचे. अशीच तीन-चार वर्षं निघून गेली. इतक्या वर्षांत त्या घराला विसर पडलेला गजरा मात्र रोज आपल्या सुगंधाने त्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचे काम बिनबोभाट करत होता.

    एकदा मात्र कहर झाला, त्यादिवशी दुपारी सगळे आराम करत असताना सुमतीताई अचानक घरातून निघून गेल्या… अर्ध्या-पाऊण तासाने त्या घरात नाही हे लक्षात येताच सगळेच घाबरले. सगळीकडे शोधाशोध सुरू झाला, पण त्या काही सापडेना. जवळच्या नातेवाईकांना फोन करून झाले… नानासाहेबांच्या, सौमित्रच्या मित्रांना विचारले गेले… पण सुमतीताईंचा काहीच पत्ता लागत नव्हता… शेवटचा उपाय म्हणून पोलिसांत तक्रार द्यायची ठरले. तेवढ्यात त्यांच्याच एरियात राहणाऱ्या माणसाने सुमतीताईंना आपल्या गाडीतून घरी आणले, त्या रस्त्यावर सिग्नलच्या मधोमध भांबावलेल्या अवस्थेत उभ्या होत्या, असे त्याने सांगितले. त्यांच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता, लोक ओरडत होते, बरं त्यांना काहीच आठवत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना नेऊन पोलीस स्टेशनला बसवले होते. हे सर्व त्या माणसाने पाहिले आणि बाई ओळखीच्या वाटल्यामुळे त्यांच्या मागे जाऊन, पोलीसांशी बोलून तो सुमतीताईंना आपल्यासोबत घेऊन आला होता.

    आता सुमतीताईंच्या वागण्याची हद्द झाली होती. आज इतक्या दिवसांनी नानासाहेबांच्या “मेल इगो”ने डोकं वर काढले होते. नानासाहेबांनी काही न बोलता त्या दिवसापासून त्यांना खोलीत बंद करून ठेवले होते. त्यांना सुमतीताईंचे हाल पाहवले जात नव्हते. एका निर्णयाशी येऊन ते थांबले होते. त्या दिवसापासून त्यांनी सुमतीताईंसाठी गजरा आणणे बंद केले. त्यांना या गोष्टीचा खूप क्लेश झाला… पण इतरांच्या सुखाकरिता त्यांनी स्वतःला कठोर केले. सुमतीची त्या गजऱ्याशी असलेली स्मृती त्यांनी विस्मरणात टाकली होती. तिचे धागेदोरे कापले होते. त्यांच्या अशा वागण्याने घरचे लोकही भांबावले होते, पण या वेळेस नानासाहेबांनी कोणाचेच ऐकले नव्हते. त्या बंद खोलीत सुमतीताई कितीतरी काळ तशाच घालवायच्या. एकट्याच असल्याने स्वतःशीच बोलत रहायच्या, गजरा आणला नाही म्हणून खंत व्यक्त करायच्या… हळूहळू त्यांची प्रकृती ढासळत होती. म्हणायला सौमित्र त्यांना खोलीच्या बाहेर काढून थोडं बाहेर बगीच्यात फिरवायचा. पण त्या आता परत अबोल झाल्या होत्या. एक दिवस सौमित्रसोबत बाहेर फिरत असताना, “मला कोणीतरी बोलावते आहे, माझा गजरा कुठे आहे? मला तयार व्हायचे आहे…” अशा काहीतरी त्या आपल्याशीच बरळत होत्या. ते नानासाहेबांनी ऐकले आणि त्यांना गहीवरुन आले. झाली तेवढी शिक्षा पुरे म्हणून त्यांनी त्या दिवसापासून सुमतीताईंसाठी गजरा आणणे सुरू केले… त्या दिवशी गजरा दिसल्याबरोबर सुमतीताईंचा चेहरा खुलला! त्यांनी तो लगेच केसात माळला.

    असे सात-आठ दिवस गेले. एक दिवस नानासाहेब झोपेतून जरा उशिरा उठले… आज सुमतीच्या खोलीत त्यांना काही हालचाल दिसली नाही… झोपली असेल म्हणून तिकडे न जाता त्यांनी आपले स्वतःचे नित्यकर्म आटोपले आणि ते आदल्या दिवशी आणलेल्या दोन गजऱ्यांपैकी उरलेला एक गजरा घेऊन सुमतीताईंच्या खोलीत गेले तर, सुमतीताई हातात आदल्या दिवशीचा गजरा घेऊन शांत झोपलेल्या त्यांना दिसल्या. आवाज देऊनही त्यांची काहीच हालचाल न दिसल्याने नानासाहेबांनी बेचैनीने त्यांना हलवले तर सुकलेला गजरा सुमतीताईंच्या हातातून खाली निसटला. नानासाहेब काय समजायचे ते समजले. सुमतीताई नानासाहेबांच्या त्या गजरारुपी प्रेमाच्या आठवणी कायमच्या आपल्यासोबत घेऊन गेल्या होत्या… स्वतः विस्मरणात जाऊन आपल्या कुटुंबाच्या स्मृती त्यांनी त्या गजऱ्याच्या साक्षीने सगळ्यांच्या मनःपटलावर कायमच्या कोरल्या होत्या…

    हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!

    त्या गेल्या तरी विविध गजऱ्यांच्या रूपाने कायम स्मरणात राहिल्या होत्या. त्या गजऱ्याने त्या घरातील लोकांना जीवनावर भरभरून प्रेम कसे करावे ते शिकवले होते… एक छोटीशी आठवण नवरा बायकोचे सहजीवन कसे समृद्ध करू शकते, हे तो गजरा आपल्या अबोल अस्तित्वातून सांगून गेला होता… पण फार उशिराने या गोष्टी नानासाहेब, सौमित्र आणि मेघाच्या लक्षात आल्या होत्या. नानासाहेब सुमतीताईंच्या निष्प्राण देहाजवळ हातात मोगऱ्याचा ताजा गजरा घेऊन सुमतीताईंच्या उठण्याची वेडी आशा बाळगून उभे होते. तो गजरा निश्चितच काहीतरी चमत्कार करेल, असे त्यांना वाटत होते. एकटक ते सुमतीताईंच्या चेहऱ्याकडे पाहात होते… सुमतीताई गेल्या तरी त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. एका हाताशी खाली सुकलेला गजरा पडला होता. विस्मृतीमध्येही त्या गजऱ्याने त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम केले होते. त्यांच्या काही आठवणी त्या गजऱ्याने कायम सुगंधीत करून ठेवल्या होत्या.

    त्या गेल्या त्या दिवशी अंगणातील सगळीच फुलझाडे फुलांनी बहरली होती. सुमतीताईंच्या शेवटच्या प्रवासात ती फुले गजरा होऊन त्यांच्यासोबत जाण्यास तयार होती. आपल्या अंगभूत असलेल्या सुवासाने त्यादिवशी सगळे वातावरण त्या फुलांनी भारुन टाकले होते. कोपऱ्यावरची गजरे विकणारी बाईपण अंगणात उभी राहून सुमतीताईंसाठी हातात मोगऱ्याचे गजरे घेऊन उभी होती. रोज गजऱ्याचा हट्ट धरणारी सुमती अखेरच्या प्रवासाला निघाल्या होत्या, हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते… पण तिच्या हातातील गजऱ्याला बहुदा ते माहीत असावे म्हणून ते गजरे कधीही घरी न येणाऱ्या बाईला घेऊन सुमतीताईंची शेवटची भेट घेण्याकरिता आले असावेत…

    समाप्त

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn