Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!
    ललित

    अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 2, 2026Updated:March 17, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, इनोव्हेटिव्ह कल्पना, म्हशींचे रस्ता क्रॉसिंग, म्हशींच्या मदतीने रस्ता क्रॉसिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हैस, रस्त्यावरील हेवी ट्रॅफिक, ट्रॅफिकमधून रस्ता ओलांडणे, ट्रॅफिंगमध्ये रोड क्रोसिंग,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुधीर करंदीकर

    मी राहतो पुण्याला कर्वेनगर या भागात. आम्ही रोजच दुपारी बावधन या भागात मुलीकडे जातो. नातवंडं दुपारी शाळेतून घरी येतात. त्यावेळेला आम्ही घरी असल्यामुळे त्यांचे दुपारचे खाणे – पिणे, अभ्यास, क्लासला सोडणे / आणणे वगैरे याची काळजी रहात नाही. संध्याकाळी मुलगी किंवा जावई ऑफिसमधून घरी आले की, थोड्या गप्पा मारून, आम्ही साधारण 6 – 6.30 ला तिथून निघून कर्वे नगरला, आमच्या घरी येतो. आमचे जाणे येणे स्कूटरने असते. कधी-कधी बायको बावधनहून स्कूटर घेऊन आधी निघून जाते, अशावेळेस मी घरापर्यंत कधी पायी जातो, कधी अर्धे अंतर बसने आणि पुढचे पायी जातो.

    एक दिवस बायको स्कूटर घेऊन लवकर घरी गेली म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मला बसने घराकडे जायचं होतं. मुलीकडून 6.30 वाजता निघालो. साधारण 5-7 मिनिटे चालत गेलो की, मेन रोड लागतो. रस्ता ओलांडलं की, समोरच बसचा थांबा आहे. ट्रॅफिकच्या पीक-आवर्समध्ये पुण्यात कुठलाही रस्ता ओलांडणे, हे एक दिव्यच असते. मी जाऊन रस्त्याच्या अलीकडे उभा राहिलो आणि ट्रॅफिकमध्ये गॅप पडण्याची वाट बघत थांबलो. त्या दिवशी ट्रॅफिक जरा जास्तच होतं. या रोडची खासियत अशी आहे की, पुणे विद्यापीठ ते व्हाया पाषाण रोड – व्हाया चांदणी चौक – पौड डेपोपर्यंत, म्हणजे साधारण पाच ते सहा किमी अंतरामध्ये कुठेही सिग्नल नाही. त्यामुळे सगळ्याच गाड्या, म्हणजे कार, स्कूटर, मोटर सायकल, बसेस आणि ऑटो रस्त्याच्या दोन्हीकडून सुसाट स्पीडने धावत असतात. बहुदा, 4-5 मिनिटे गेली की, छोटीशी गॅप मिळते आणि त्यामध्ये जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करता येतो. आज काय प्रकार होता माहीत नाही, मधे गॅपच येत नव्हती. बाजूला बघितलं, तर काही तरुण मंडळी गॅप नसताना पण, धावून रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात एक अंध व्यक्ती समोरून आरामात रस्ता ओलांडून आली. अज्ञानात सुख असतं, असं म्हणतात, ते असं!

    मी बऱ्याच वेळेला चार-पाच पावलं पुढे जायचो आणि वेड्यावाकड्या येणाऱ्या गाड्यांना घाबरून परत मागे यायचो. पण पुढे जायची हिम्मत होत नव्हती. वाट बघता बघता 10 मिनिटे झाली, पण ‘नो चान्स’! अशा वेळेस वाटतं की, काहीतरी घडून ट्रॅफिक जॅम व्हावं, त्यामुळे आपोआपच क्रॉस करणाऱ्यांची सोय होते. पण तसंही आज काही घडत नव्हतं. 15 मिनिटे झाली, तरी मी होतो त्याच ठिकाणी उभा होतो.

    हेही वाचा – कानाला खडा… माझा व्हॅलेंटाइन डे!

    तेवढ्यात माझी नजर मागे गेली. मागे एक तगडी म्हैस उभी होती आणि तिच्या गळ्यातली दोरी धरून मुलगा उभा होता. म्हशीकडे बघताच मी मनातल्या मनात ‘युरेका’, ‘युरेका’ (म्हणजे ‘सापडले’, ‘सापडले’) असे ओरडलो. मी लगेच त्या मुलाकडे गेलो.

    मी : दादा, म्हैस घेऊन पलीकडे चलणार का?

    मुलगा : कशाकरता? काय करायचं आहे?

    मी : करायचं काहीच नाही. फक्त पलीकडे माझ्याबरोबर चलायचं आणि लगेच परत यायचं. पाच रुपये देईन.

    (मुलाला काहीच अर्थबोध झाला नसावा. पण पाच रुपये मिळणार आणि करायचं काहीच नाही, हे त्याला समजलं.)

    मुलगा : काका, चला…

    मुलगा म्हैस घेऊन निघाला. मी म्हशीची ढाल करून, तिच्या उजव्या बाजूने रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. इतका धुव्वाधार ट्रॅफिक असूनही मी मजेत रस्ता ओलांडत होतो. काही वाहन चालकांनी म्हशीकरिता कर्कश्श हॉर्न वाजवले, काहींनी म्हशीला मनात शिव्या दिल्या असतील. आम्ही थाटात पलीकडे पोहोचलो. मी मुलाला पाच रुपये दिले आणि आभार मानले. पलीकडे चार वयस्कर रस्ता क्रॉस करायला उभेच होते. मला इतक्या आरामात रस्ता ओलांडतांना बघून, सगळेच मुलाला म्हणाले – अरे, आम्हाला पण पलीकडे सोड. आम्ही प्रत्येकी 2 – 2 रुपये देऊ. लगेच मुलाने म्हैस मागे वळवली आणि सगळे म्हशीच्या आडोशाने पलीकडे निघाले. मला हे बघताना मजा वाटली. मी जवळच्या बस थांब्यावर जाऊन बसची वाट बघत बसलो.

    रस्त्यावरचा ट्रॅफिक मगाशी होता, तसाच टॉप गिअरमध्ये होता. सहजच माझं लक्ष पलीकडून येणाऱ्या म्हशीकडे गेलं. दोन वयस्कर म्हशीच्या आडोशाने रस्ता क्रॉस करत होते. म्हशीच्या फेऱ्या सुरू झालेल्या बघून मला मजा वाटली आणि लक्षात आलं की, म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं, यासारखा सुरक्षित पर्याय नक्कीच नाही. तेवढ्यात त्या मुलाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्याने आनंदाने हात हलवला. बहुदा मनामध्ये मला ‘थँक्स’ म्हटले असेल. मी पण हात हलवून त्याच्याशी संवाद साधला. तेवढ्यात माझी बस आली आणि मी आत चढलो.

    नंतर साधारण महिनाभर माझी जा- ये स्कूटरनेच सुरू होती. स्कूटर असली की, माझा जाण्या-येण्याचा रस्ता थोडा बदलतो.

    आज बायको स्कूटर घेऊन बावधनहून लवकर घरी गेली, त्यामुळे मला बसने जायचे होते. मुलीकडून निघालो आणि चालत मेन रोडला पोहोचलो. साडेसातची वेळ असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुसाट गाड्या धावत होत्या, सगळीकडून हेडलाइट डोळ्यांवर येत होते… कर्कश्श हॉर्न वाजत होते. काही टू-व्हीलरवाले उलटीकडून येत होते. काही फुटपाथवरून येत होते. थोडक्यात म्हणजे, पुण्यातल्या कुठल्याही हमरस्त्याचं चित्र समोर होतं. चित्रातला एक रंग मिसिंग आहे, हे पटकन लक्षात आलं. जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करताना कुणीच दिसत नव्हते. मी मनात म्हटलं, हे गेले कुठे? तेवढ्यात माझं लक्ष थोडं पलीकडे उभ्या असलेल्या म्हशीकडे गेलं आणि म्हशीबरोबरच्या मुलाचं माझ्याकडे गेलं. मला बघताच मुलांनी हात उंचावला आणि ओरडला, ‘काका, चला पलीकडे सोडतो. फ्रीमध्ये, पैसे द्यायचे नाहीत’.

    माझ्या डोक्यात महिन्यापूर्वीच्या घटनेची ट्यूब पेटली, आपण याला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचे पाच रुपये दिले होते.

    मुलगा मला थांबा म्हणाला आणि धावत जवळच्या फुलवाल्याकडून एक फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आला. मला गुच्छ देऊन त्यानी खाली वाकून मला नमस्कार केला आणि म्हणाला, “काका चला.”

    आम्ही म्हशीच्या आडोशाने रस्त्यावर उतरलो आणि चालायला लागलो. महिन्यापूर्वी गेलो होतो, तेव्हा म्हैस थोडी बिचकत होती. आज ती एकदमच कम्फर्टेबल वाटत होती. आपल्याकडे सिग्नल तोडणारे, उलटे येणारे, फुटपाथवर गाड्या घालणारे जेवढे कम्फर्टेबल असतात तेवढीच!

    चालता चालता —

    मी : अरे, म्हशीला घेऊन इकडे काय करत होतास? आणि मला हा गुच्छ कशाकरिता?

    मुलगा : काका, गेल्या वेळेला आपण भेटलो होतो, त्या दिवसापासून मी रोजच इथे असतो आणि रोजच तुमची वाट बघत होतो.

    मी : कशाकरिता?

    मुलगा : तुम्हीच मला हा मार्ग दाखवला. संध्याकाळी रोज म्हशीला घेऊन इथे येतो आणि रस्ता क्रॉस करणाऱ्यांची मदत करतो, मला पण छान पैसे मिळतात. गेल्या 10 दिवसांपासून याच रोडवर आता 8 म्हशी सोडल्या आहेत. घरचे सगळेच म्हशींबरोबर इथे निरनिराळ्या चौकात येतात आणि दोन-तीन तास थांबतात. रोजचे म्हशीमागे 80 ते 100 रुपये मिळतात. या वेळेला म्हशींना काहीच काम नसते. त्यांची खाण्यानंतरची शतपावली होते. रात्री त्यांना झोप पण छान लागत असेल. त्यामुळे दूध पण वाढले आहे.

    मी : ट्रॅफिक कमी असेल तर ट्रिपा मिळत नसतील!

    मुलगा : काका, क्रॉस करणारी पब्लिक कायमच असते आणि ट्रॅफिक कमी असताना गाड्यांवाले जास्तच स्पीडने आणि वेड्यावाकड्या गाड्या चालवतात. त्यामुळे माझ्या ट्रिपांना मरण नाही. अगदीच दुपारी किंवा रात्री 9 वाजल्यानंतर मीच येत नाही.

    मी : वा, क्या बात है!

    तेवढ्यात आम्ही पलीकडे पोहोचलो. तिथे पाच-सहा वयस्कर स्त्री – पुरुष उभे होतेच. मुलाने लगेच त्यांना माझी ओळख करून दिली – “या काकांनीच मला ही म्हशीची कल्पना दिली…” वगैरे.

    मी मनातून आनंदलो आणि देवाचे आभार मानले.

    सगळ्यांनीच मला थँक्स दिले. त्यातल्या तिघा जणांनी मला बाजूला घेतले आणि मुलाला सांगितले, ‘आम्ही पुढच्या ट्रिपला येतो. तू जा पुढे’.

    एक जण (मला) : तुम्ही आमचा आणि आमच्या घरच्यांचा फार मोठा प्रॉब्लेम सोडवला आहे. आता घरून बाहेर पडताना बायको बजावते, ‘म्हैस असेल तरच रस्ता क्रॉस करा. दोन-पाच रुपये जाऊ देत!’

    दुसरी व्यक्ती : पूर्वी रोज रस्ता ओलांडताना समोर म्हशीवर बसलेले यमराज दिसायचे. आता त्यांची म्हैसच बरोबर असते, त्यामुळे एकदम ‘बि – न – धा – स्त’.

    तिसरी व्यक्ती : आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढच्या मीटिंगला आम्ही तुम्हाला बोलावू. आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुम्हाला नक्की यायचे आहे. तुमची म्हशींची कल्पना म्हणजे – तोड नाही.

    फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. त्यांना बाय करून मी बस स्टॉप वर पोहोचलो. तिथे बसायला नवीनच बाक केले आहेत. बाकावर बसलो आणि कल्पनेच्या दुनियेत पोहोचलो…

    पुढच्या काही दिवसांनंतरची वर्तमानपत्रे मला दिसायला लागली –

    ‘सीनिअर सिटिझन्सच्या मदतीला म्हशी सरसावल्या!’

    पुण्यातल्या रस्त्यांवर चालणे ‘मौत का कुंवा’मध्ये गाडी चालवण्याइतके धोकादायक होते. तुम्हाला कोण आणि केंव्हा उडवेल, ही चालणाऱ्यांच्या मनात सतत धास्ती असायची. म्हशीचा आडोसा घेऊन चालताना लोकांची ही धास्ती आता संपली आहे. खाली निरनिराळ्या चौकातले वयस्कर मंडळींना घेऊन रस्ता क्रॉस करणाऱ्या म्हशींचे फोटो होते.

    हेही वाचा – फॅशनची हुडहुडी… वेळीच व्हा सावध!

    ‘रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्स ना रामराम’

    बहुतेक रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स हद्दपार  झाले आहेत. रस्त्यांवर ठराविक अंतरांवर म्हशींची जा – ये सुरू असल्यामुळे वाहनांच्या वेगावर आपोआपच वचक बसला आहे. ‘वाहने सावकाश चालवा, पुढे स्पीड ब्रेकर आहे’ या पाट्या जाऊन, ‘म्हशी पुढे आहेत’ अशा पाट्या आल्या आहेत.

    ‘आर्थोपेडिक क्लिनिकमधली गर्दी ओसरली’

    रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स काढल्यामुळे वाहन चालकांचे पाठीचे आणि कंबरेचे दुखणे यात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.

    ‘शाळा चालकांची म्हशीला पसंती’

    शाळा सुटल्यानंतर लहान मुले रस्ता ओलांडताना वाहनांची नेहेमीच दशहत असायची. शाळांनी शाळा सुटताना शाळेसमोर दोन म्हशी तैनात कराव्या, अशी पालकांनी शाळा चालकांकडे मागणी केली आहे. बहुतेक शाळा चालकांनी याला मंजुरी दिली आहे.

     ‘म्हशींना सर्वच शहरांमध्ये डिमांड’

    सर्वच मोठ्या शहरांमध्ये पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकरता म्हशींची मदत घेणार. पाहणी पथके पुण्यात दाखल. वर्षातली सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना म्हणून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता! मीडिया संशोधकाच्या शोधात!!!

    काहीतरी गोड आवाजामुळे माझी तंद्री मोडली. शेजारी बसलेली मुलगी सांगत होती, बस येतेय, चला. लांब बस दिसत होती. मी उठून पुढे आलो. बाजूला म्हशीच्या ट्रिप सुरू होत्याच. तेवढ्यात बस आली. मी म्हशीकडे बघून तिला बाय केलं आणि बसमध्ये चढलो.

    (पूर्व प्रसिद्धी ‘लोकसत्ता’)


    मोबाइल – 9225631100

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn