संगीता भिडे
‘वही’ ही तर माझी सगळ्यात पहिली आणि जीवा-भावाची मैत्रीण. अगदी अंधुक आठवण आहे… मी आईजवळ हट्ट केला, ‘मला तात्यांसालखी (तात्या माझे वडील) मोट्टी मोट्टी वही हवी.’ ‘तू त्यांच्याशालकी खूप मोट्टी हो, मग आणू तुला अश्शीच वही हं. आत्ता तू पाटीवर लिही खडूनं हं…’ इति आई. ‘नाई, मला आत्ताच हवी मोSSSट्टी वही. मी आता खूप मोSSSट्टी हाए. मला पण तात्यांशालका खूप खूप अभ्यास कलायचा हाए.’ इति अस्मादिक.
खरंतर, अस्मादिकांना अक्षर ओळखही नव्हती तेव्हा. पण बालहट्ट! आईने माझ्यासाठी लगेच एक वही आणली. मग काय? आमची स्वारी एकदम खूश! काय लिहिलं नाही त्यात! उभ्या, आडव्या, तिरप्या-तारप्या कोणत्याही आकाराच्या रेघोट्या… कुठे कुठे गोलाकार नसलेले गोल गोल चेंडू… या वहीत माझं सारं साहित्य सामावलेले असायचं, बरं का? वही उलटी धरली तरी, कोणतीही गोष्ट वाचता यायची, चित्रं ओळखता यायची, अगदी आकडे सुद्धा वाचता यायचे. सगळी नुसती मज्जाच मजा!
अशी ही वहीची साथसोबत अजूनही सुटलेली नाही. या वहीनं मला एक फार मोठा आनंद दिला. आई-तात्या कौतुकाने माझी पापी घ्यायचे आणि मला वाटायचं, ‘झाले की, मी पण तात्यांशालकी हुशाल, हुशाल!’
हेही वाचा – दरवाजे… जन्मापासून मृत्यूपर्यंतचे…
वाढत्या वयाबरोबर या वह्यांची संख्या वाढू लागली हळूहळू. एक वही सुवचनांची, एक म्हणींची, एक नानाविध गाण्यांची, सुभाषितांची, वाचलेल्या पुस्तकांतील आवडलेल्या उताऱ्यांची, कवितांची इत्यादी इत्यादी आणि एका वहीत तर सुविख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी काढलेल्या व्यंगचित्रांची सुद्धा. धमाल गंमत जमलेली. मी काढलेली ही व्यंगचित्र मी खात्रीने ती. भाऊ काकांना दाखवत असे, त्यांनी ‘छान काढतेस’ असं म्हटलं की, काय आनंद व्हायचा! ही वही केव्हा आणि कशी गायब झाली कळलंच नाही. या वहीचं मैत्र अचानक तुटल्यामुळे काय वेदना झाल्या ते कसं सांगू? असो.
एक वही तर फक्त माझी आणि माझ्यापुरतीच आहे. सर्व सुख-दु:खांचा संवाद अगदी मनमोकळेपणी फक्त या वहीरूपी सखीशीच असतो, सुखदु:खांना वाचा फोडणारी, माझ्याशी मोकळा संवाद करणारी, अशी ही माझी वहीरूपी सखी म्हणजे माझी जीवश्चकंठश्च मैत्रीण!
हेही वाचा – गैरसमज…
अशा या नानाविध मैत्रिणींची साथसोबत आजतागायत आहे. म्हणूनच माझ्या आयुष्याला सुगंध आहे, अर्थ आहे आणि जगणेही आनंदाचे आहे. असं हे वह्यांमध्ये सामावलेलं निरपेक्ष नाते. माझ्यासाठी अनमोल आणि बहुमोल, नव्हे। जीविची जीवलग आहे – माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत!
आणि हो, माझ्या शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या वह्या म्हणजे माझ्यासाठी तर श्वास आहेत, ध्यास आहेत. त्यामुळेच अचानक वयाच्या साठी-पासष्टीनंतर उसळून वर आला गाण्याचा ध्यास, त्यातूनच सुरू झाला स्वरचित शास्त्रीय संगीत बंदिशींचा प्रवास, भजने, भक्तिगीते, गझल, बडबडगीते, भावगीते इत्यादींना संगीतबद्ध करून स्वतःच सादर करण्याचा प्रवास. खरंतर, या प्रसववेदना अगदीच अकाली! तरीही खूप खूप सुखावणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या. तेव्हा या गानसखीची सोबत खूपच स्वरमय आणि निरामय! अशा या माझ्या सख्या का नाही आवडणार मला?
अशी ही ‘वही’ अखंड साथसोबत माझ्यासाठी
तीच तर आहे माझ्या उतारवयातली आधाराची काठी!
इति अलम्!

