Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»कुणीतरी आहे तिथे!
    अवांतर

    कुणीतरी आहे तिथे!

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 5, 2026Updated:March 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, कुणीतरी आहे तिथे, बॅगची चोरी, ऑफिस बॅग चोरी, सॅकची चोरी, सॅक चोरी, माणुसकी जिवंत, लॅपटॉपची चोरी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    बरेच दिवस झाले या प्रसंगाला, पण आजही तो अगदी लख्खपणे आठवतो मला.  निष्काळजीपणा आणि बेफिकिरी किती तापदायक ठरते याचा तो अनुभव, आजही मला हैराण करून सोडतो. शनिवार होता त्या दिवशी. मी ऑफिसला गेलो होतो आणि काम झालं म्हणून लवकर निघालो होतो. लोभस शनिवार संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशीच्या गोजिऱ्या रविवारची स्वप्नं बघत…

    दुसरा शनिवार होता, त्यामुळे गाड्यांना जास्त गर्दी नव्हती. मस्त खिडकीपाशी जागा मिळाली आणि मी खूश झालो. पुस्तक काढलं, सॅक वर ठेवली आणि वाचनात गुंग झालो… मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये, अशी वर ठेवलेली सॅक सुरक्षित असते. सहसा चोरीला वगैरे जात नाही, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव, त्यामुळे ती एकदा वर टाकली की, गंतव्य स्थान आल्यावरच काढायची, असा शिरस्ता. आहे ना वर ठेवलेली, मग ती असणारच सुरक्षित, असा विश्वास.

    त्या दिवशी का कोणास ठाऊक, पण कुर्ल्याला गाडी थांबल्यावर मी अगदी सहज म्हणून वर बघितलं आणि छातीत धस्स झालं माझ्या. वर नव्हतीच सॅक माझी! मी पटकन उठून उभा राहिलो आणि बाहेर उभ्या असणाऱ्या लोकांकडे चौकशी केली तर, एक जण म्हणाला, ‘आत्ताच एकजण वर ठेवलेली सॅक घेऊन उतरला.’ गाडी सुटतच होती आणि तेवढ्यात मी पण  उतरलो खाली. बघितलं इकडे तिकडे, पण माझी सॅक घेऊन जाणारा कोणीच दिसेना मला…

    मटकन् बसलो समोरच्या बाकड्यावर, डोकं हातात धरून. दरदरून घाम फुटला मला. बॅगेत लॅपटॉप, पाकीट, घराच्या किल्ल्या या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. बाकी किरकोळ कागदपत्रं होती, ऑफिसची. पाकिटात पैसे, क्रेडिट कार्डस्, डेबिट कार्डस् आणि बऱ्यापैकी रोख रक्कम होती. संक्रांत कोसळली होती जणू माझ्यावर. काय करावं, काही सुचेना!

    हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस

    तसाच तिरिमिरीत फलाट क्रमांक एक वरील आरपीएफच्या चौकीत गेलो. तिथे असणारा उत्तर भारतीय जवान म्हणाला, “ आपको जीआरपी के पास जाणा पडेगा.“ मी म्हणालो, “CCTV फुटेज दाखवा म्हणजे कळेल तरी, कोणी घेतली बॅग ते!“

    “आप को उनसे लिखवा के लाणा पडेगा और उनको साथ में आणा पडेगा आप के!” मुलखाची मग्रूरी…

    माझी वरात निघाली फलाटाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या जीआरपीच्या चौकीकडे. तिथे सगळे मराठमोळे बोरूबहाद्दर बसलेले. माझी दर्दभरी कहाणी त्यांच्यापैकी एकाला ऐकवू लागलो मी आणि कान कोरत, माझ्याकडे दयार्द्र दृष्टीने बघत त्याने विचारलं, ‘काय काय होतं ब्यागेट?“

    “लॅपटॉप होता, किल्ल्या आणि पाकीट होतं. त्यात रोख रक्कम, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड  आणि माझी क्रेडिट तसेच डेबिट कार्ड्स होती…”

    “लॅपटॉप तुमचा स्वतःचा का ऑफिसचा?”

    त्याने काय फरक पडतो असं विचारावं, असं अगदी तोंडाशी आलं होतं, पण उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला? म्हणून तोंड बंद ठेवलं… “ऑफिसचा आहे.”

    “पैशे किती होते पाकिटात?”

    “असतील दोन-अडीच हजार…”

    “काय पुरावा? अडीचशे पण असतील. कशावरून तुम्ही खरं सांगताय?”

    एकीकडे चोरी झाल्याचा आणि फसवले गेल्याचा मानसिक धक्का, तर दुसरीकडे ही सरकारी, उर्मट, उलट तपासणी. कात्रीत अडकलो होतो मी, हकनाक! शहाण्या माणसाने पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढायचं धाडस करू नये, हे वचन पुरेपूर अनुभवत होतो मी…

    हे सगळं सुरू असताना, मला अचानक आठवण झाली, सगळी कार्डस् ब्लॉक करायला हवी होती तातडीने, नाहीतर आणखी खड्डा बसायची शक्यता होती. त्या हवालदाराला म्हणालो, “जरा थांबा मी कार्डस् ब्लॉक करतो.” त्यांनी लगेच हातातला कागद ठेवून दिला आणि पिंक टाकायला उठले महाराज!

    कोटक, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या तीन बँकांची क्रेडिट आणि डेबिटकार्ड होती. त्यांच्या वेबसाइटवरून नंबर घेऊन फोन फिरवायला सुरुवात केली आणि एका नव्या भूलभुलैय्याचा अनुभव घेतला. एक दाबा, दोन दाबा… करत मर्त्य मानवाशी बोलणं झाल्यावर, फोन करणारा कार्डधारकच आहे, हे सिद्ध करताना खूप दमछाक झाली, पण सरतेशेवटी सगळी कार्डस् ब्लॉक करण्यात मी यशस्वी झालो!

    माझ्या कंपनीच्या एचआरला फोन करून माहिती दिली. थोडी सहानुभूती दाखवली त्यांनी, पण ‘लॅपटॉपची किंमत तुमच्या पगारातून वळती करण्यात येईल,’ हे सांगण्यासही मागेपुढे बघितलं नाही. आलिया भोगासी… कुठे ती आलिया आणि कुठे मी, पोलिसांशी झुंजत असलेला!

    आता परत मोर्चा पोलीस दादाकडे… सगळं ऐकून घेतलं त्यांनी आणि म्हणाले, “या कागदावर केस लिहून द्या, त्याची डायरीत नोंद होईल. तुमची बॅग ‘भेटली’ तर कळवू तुम्हाला.” म्हणजे शक्यता जवळपास नव्हतीच.

    च्या मारी, मलाच लिहायचं होतं, तर एवढा वेळ कशाला चौकशीचं चऱ्हाट लावलं होतं, कोणास ठाऊक?

    मी सगळं प्रकरण, त्यांनी दिलेल्या कार्बन घातलेल्या, कोऱ्या कागदावर लिहून काढलं. “साह्येब, मराठीत लिवा हां, इंग्लिश नको,” हा अनाहूत सल्ला पण ‘भेटला’ जाता जाता. एक प्रत त्यांनी त्यांच्याकडे ठेवली, दुसरीवर सही, शिक्का दिला आणि माझी बोळवण झाली. “हा कागद दाखवला की टीसी काही बोलणार नाही, बिनधास्त जावा,” असं तो म्हणाला आणि मला हसावं का रडावं कळेना…

    “ते जरा CCTV चं…”

    “ काय करणार तुम्ही बघून? उगाच आमच्या आणि तुमच्या वेळेची खोटी! ब्याग भेटली का फोन करू. जावा तुम्ही आता…” त्याचा उद्दाम स्वर आणि त्याच्यासमोर हताश मी!

    मान खाली घालून बाहेर पडलो चुपचाप. माझ्या हातात काही नव्हतं आणि खिशात एक दमडीही नव्हती. आपण किती सामान्य आहोत, हे कळून चुकलं मला, त्या तासा-दीड तासात!

    माझी घरी पोहोचायची वेळ उलटून गेली होती आणि बायकोचा फोन आला. सगळं तिला थोडक्यात सांगितलं आणि म्हटलं, “आत्ता निघालोय यायला.”

    “अरे देवा, जाऊदे ते सगळं, तू नीट परत ये बाबा,” असा समजूतीचा स्वर तिने लावल्यावर मला हायसं वाटलं.

    अत्यंत विमनस्क अवस्थेत प्रवास करत, पाय ओढत घरी पोहोचलो. खूप काहीतरी गमावलंय आपण, असं वाटत होतं. त्याच अवस्थेत जेवलो कसाबसा, पण मनात विचारचक्र सुरूच होतं. झोप लागणं निव्वळ अशक्य होतं. तळमळत, कूस बदलत झोपायचा प्रयत्न करत होतो. बारा वाजून गेले होते, काटा एक कडे झेपावत होता आणि तेवढ्यात फोन वाजला.

    धडपडत उठलो आणि फोन घेतला. अनोळखी नंबर होता… “पराग गोडबोले बोलताय का? मी आसनगाव स्टेशनवरून XXX XXXX बोलतोय. तुमची बॅग विसरली आहे का आज गाडीत?”

    “हो, हो, विसरली नाही, चोरीला गेली गाडीतून…” माझ्या स्वरातली अधीरता आणि उत्सुकता जाणवली असेल पलीकडच्या माणसाला. “आसनगावला ती ट्रेनमध्ये वर ठेवलेली मला दिसली. मी उघडून बघितली, त्यात तुमचं कार्ड सापडलं म्हणून फोन केला. काय काय होतं तुमच्या बॅगेत? “

    “लॅपटॉप, पाकीट, घराच्या किल्ल्या,  आणि कागदपत्र होती काही… सगळं आहे का नीट?” माझा काळजीयुक्त प्रश्न.

    “कॅश होती का काही?”

    “साधारण अडीच हजार वगैरे असेल आणि कार्ड होती तीन-चार!”

    “बाकी सगळं आहे, फक्त कॅश नाही भेटली. ती काढून घेतली असेल चोराने. मी स्टेशनमास्तरांच्या ऑफिसमध्ये ठेवतोय बॅग, तुम्ही उद्या येऊन घेऊन जा.” त्या ऑफिसमधल्या माणसाशी त्यांनी बोलणं करून दिलं आणि त्या अनोळखी देव माणसाचे कसे आभार मानावेत, कळेच ना मला! आनंदाश्रू ओघळले माझ्या डोळ्यांमधून आणि माणसामधल्या माणुसकीवर परत एकदा अतोनात विश्वास बसला माझा.

    हेही वाचा – वेंधळेपणा, पुन्हा एकदा!

    दुसऱ्या दिवशी सकाळी मी बॅग ताब्यात घेतली आणि या प्रसंगातून आयुष्यभराचा धडा शिकलो. परत एकदा, त्या भल्या माणसाला फोन करून त्याचे आभार मानले आणि प्रवास परत सुरू झाला जीवनाचा…!

    असे प्रसंग आणि अशा घटना सोबत करत राहतात आयुष्यभर, सगळंच काही संपलेलं नाही, ‘कुणीतरी आहे तिथे,’ याची जाणीव करून देत.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn