Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»वैद्य सर…  सर्वात श्रीमंत मीच!
    ललित

    वैद्य सर…  सर्वात श्रीमंत मीच!

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 12, 2025Updated:March 17, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कोल्हापूर युनव्हर्सिटी, वैद्य सर, मनोहर शिंदे, अरुणाचा आरोप, हतबल अरुणा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 3

    मी दोन दिवसांनी पुण्याला आलो. पुण्याला एका ट्युशन क्लासमध्ये इंग्रजी शिकवू लागलो आणि नोकरीसाठी अर्ज, परीक्षा देऊ लागलो. दोन महिन्यांत भारत सरकारच्या संरक्षण खात्यात माझी निवड झाली आणि मी दिल्लीला आलो. माझा पगार सुरू झाला. त्यामुळे भावंडांची शिक्षणे झाली. माझी हुशारी, प्रामाणिकपणा यामुळे नोकरीत भरभर वर चढत गेलो. पण हे सर्व वैद्य सरांमुळेच! याची जाणीव होती. वैद्य सरांनी जगात कसे वागायचे हे शिकवले, नाहीतर आपले काय झाले असते? मागच्या भावंडांची लग्ने झाली, ती स्थिरस्थावर झाली… पण मी मात्र लग्नावाचून राहिलो. आईवडील होते तोपर्यंत लग्नासाठी मागे लागत होते. पण कोल्हापूरात मला लागलेला डाग, त्याचे काय? त्या आरोपातून मी कसा मोकळा होणार?

    गेली पंचवीस वर्षे मी दिल्लीत आहे आणि आज अचानक, सविता चौगुलेचा फोन… सर माझी आठवण काढतात की तिरस्कार करतात? सरांना सत्य काही कळलं का? पंचवीस वर्षे मी एका आरोपाखाली दबून गेलोय, त्या आरोपातून माझी सुटका होईल?

    विमानाने पुण्याच्या दिशेने उड्डाण केले. विमानतळावरून मी सरळ दीनानाथ रुग्णालयात गेलो. सर ज्या विभागात अ‍ॅडमिट होते, त्या विभागात गेलो. सविता माझी वाटच पाहत होती. तिच्याकडे मी सरांच्या तब्येतीविषयी चर्चा केली. सात वाजता सरांना भेटण्याची वेळ होती. सविताने सर ज्या सदाशिव पेठेत राहतात त्या जागेची किल्ली आणि पत्ता माझ्याकडे दिला आणि ती घरी गेली. साडेसात वाजता डॉक्टर नाडकर्णी राऊंडवर आले आणि त्यांच्याबरोबर मी सरांच्या खोलीत गेलो. पंचवीस वर्षांनंतर सर मला दिसत होते. सलाइन लावलं होत, ऑक्सिजन मास्क लावला होता. बाजूला जोडीला मॉनिटर पल्सरेट दाखवत होता. डॉक्टरनी पेशंटला तपासले. नर्सला सूचना दिल्या. मी डॉक्टरांकडे सरांच्या तब्येतीविषयी विचारले. डॉक्टर म्हणाले, “सुधारणा आहे, ब्लड प्रेशर नॉर्मल होते आहे… पल्सरेट व्यवस्थित येतो आहे… सध्या ऑक्सिजन लावला आहे उद्या तो काढूया, मग पेशंट कसा रिस्पॉन्स देतो ते पाहू.”

    डॉक्टर गेल्यानंतर मी सरांच्या बाजूला स्टूलवर बसलो. किती वर्षांनी सरांना जवळून पाहत होतो. शेवटचे पाहिले तेव्हा सरांनी मला धक्के मारून घराबाहेर काढले होते. पण त्या आधी सरांनी मला किती प्रेम दिले? खेडेगावातील एका शेतमजुराच्या मुलाला वैद्य सर भेटले म्हणून तो भारत सरकारमध्ये एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला. गैरसमजामुळे शेवटी सर कसेही वागले असले तरी, दोन वर्षे सरांनी दिलेले प्रेम कसे विसरायचे? या आणि अशा विचारात गुरफटलो असताना अचानक छोटी सुटकेस घेऊन एक स्त्री सरांच्या कॉटजवळ आली. मी चमकून पाहिले आणि ओळखले… अरुणा! जिच्यामुळे मी सरांच्या घरातून हाकललो गेलो आणि गेली पंचवीस वर्षे अपमानाच्या आगीत जळत आहे, ती अरुणा समोर उभी.

    ‘‘मनोहर केव्हा आलास? कुठे असतोस?’’

    ‘‘संध्याकाळी आलो, दिल्लीला असतो.’’

    ‘‘दादाला काय बरं नाही? मला सविता चौगुलेने फोन केला.’’

    ‘‘मला पण सविताने फोन केला, सरांना पॅरालिसीसचा अ‍टॅक आलाय.’’

    ‘‘डॉक्टर म्हणतात, उद्या ऑक्सिजन काढायचा आहे, मग निश्चित काय ते कळेल…’’ मी गप्प झालो. ती गप्प झाली. दहा मिनिटे अशीच गेल्यावर ती म्हणाली…

    ‘‘रात्रीचं काय करायचं? मी थांबू का इथे?’’

    ‘‘नको, मी थांबेन. तू सरांच्या घरी जाऊन आराम कर. ही किल्ली घे. सविताने मघाशी ही किल्ली माझ्याकडे दिली. सदाशिव पेठेत बापट ऑप्टिक्स म्हणून चष्म्याचे दुकान आहे. त्याच्यावर सर राहतात असे सविता म्हणाली होती.’’

    किल्ली घेऊन अरुणा गेली. माझ्या चुलत भाऊ जगदिश पुण्याला राहतो. मी त्याला फोन करून वैद्य सरांना दीनानाथमध्ये अ‍ॅडमिट केल्याचे सांगितले. तो लगेच हॉस्पिटलमध्ये यायला निघाला होता, पण मी म्हटले, ‘तू येऊ नकोस. मी सकाळी घरी येतो. आंघोळ करुन पुन्हा हॉस्पिटला येईन.’ डॉक्टर सकाळी दहा वाजता राऊंडला येणार होते म्हणून सकाळीच लवकर जगदिशकडे गेलो. त्याच्याकडे आंघोळ, नाश्ता करून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलो तर अरुणा आधीच येऊन कॉटशेजारी बसली होती. मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि जवळच असलेल्या नर्सला सरांच्या तब्येतीविषयी विचारले. दहा वाजता डॉक्टर आले. त्यांनी ऑक्सिजन दूर केला आणि मॉनिटर पाहात राहिले. ऑक्सिजनशिवाय सर व्यवस्थित श्वास घेत होते… सरांचा ईसीजी व्यवस्थित येतो आहे… हे डॉक्टरांच्या लक्षात आले. ब्लडप्रेशर नॉर्मल होते.

    डॉक्टर मला म्हणाले, ‘‘आता यांची तब्बेत व्यवस्थित आहे. उद्यापासून हाताला आणि पायाला फिजिओ करण्याची गरज आहे. मग पाहू कसा रिस्पॉन्स देतात ते.’’ डॉक्टर आणि नर्स दुसर्‍या रुममध्ये गेले. सर अजून बेशुद्ध होते. खोलीत राहिलो मी आणि अरुणा. मी खुर्चीवर बसून सोबतचं पुस्तक वाचू लागलो. अचानक अरुणा बोलू लागली…

    ‘‘मनोहर मला क्षमा कर, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला…”

    मी फक्त मान वर करून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा पुस्तक वाचू लागलो…

    ‘‘मनोहर तुला केव्हातरी खरं काय ते कळायलाच हवं. कोल्हापुरात गाण्याच्या कार्यक्रमामुळे विनोद आणि मी फार जवळ आलो. आमचे काही कार्यक्रम बाहेरगावीपण असायचे. विनोद धिटाईने माझा हात हातात घ्यायचा. हॉटेलमध्ये खायला न्यायचा. दादाच्या करड्या शिस्तीत हे शक्य नव्हते… पण मला ते आवडू लागले. तो मला वेगवेगळी स्वप्ने दाखवू लागला, म्हणाला, आपण दोघे स्वतःचा ऑर्केस्ट्रा काढू…. नाहीतरी मला अभ्यासाचा कंटाळाच होता. मला तो माझा राजकुमार वाटू लागला. नाहीतर, दादा कदाचित माझे लग्न तुझ्याशी लावून देईल, अशी भीती वाटत होती… कारण दादाचा तुझ्यावर प्रचंड विश्वास होता. पण मला असे कोंदट संसार नको होता. घरच्या जबाबदार्‍या नको होत्या. हळूहळू विनोद मला त्याच्या रुमवर नेऊ लागला. आमचे संबंध येऊ लागले… आणि नंतर एका बेसावध क्षणी कसलीही काळजी न घेता संबंध आला आणि नंतर उलट्या होऊ लागल्या. दादाने कॅम्पसमधील डॉक्टरना घरी बोलावले. त्यांनी तपासणी केली आणि दादाकडे स्फोट केला…”

    हेही वाचा – वैद्य सरांची शिकवणी सुरू झाली… शिष्टाचाराची!

    “दादा हवालदिल झाला. आता काय करावे, हे त्याला कळेना. मला नाव विचारू लागला. मी विनोदचे नाव सांगितले असते तर, माझी धडगत नव्हती. तुझ्यावर त्याचा विश्वास म्हणून तुझे नाव घेतले. कारण, मला वाटले होते तो चिडणार नाही…” अरुणा बोलतच होती.

    “मी तुझ्यावर अन्याय केला… विनोदच्या प्रेमात मी पागल झाले होते. विनोदला काही त्रास होऊ नये म्हणून त्याला वाचवायला गेले आणि तुझा बळी गेला…”

    मी काहीही न बोलता फक्त मान वर करून तिच्याकडे एकदा पाहिले आणि परत पुस्तकात मान घातली.

    ‘‘मनोहर, तू निर्विकारपणे ऐकतो आहेस, असे दाखवतोस, पण तुला किती मनस्ताप झाला असेल याची कल्पना आहे मला. माझा दादा म्हणजे तुझा देव होता. त्या देवाने तुला घराबाहेर काढलं. मी दादाला आणि तुला दोघांनाही मनस्ताप दिला. कॅम्पसमधील डॉक्टरांच्या सहाय्याने दादाने मला मोकळी केली. पण माझे डोळे उघडले नाहीत. सहा महिन्यानंतर मी विनोदबरोबर पळून नागपूरला गेले. तेव्हा दादाला माझा खरा प्रियकर कोण, हे कळले असेलच. तेव्हापासून मी नागपूरला आहे. विनोदने ऑर्केस्ट्रा काढला, पण दोन वर्षांत तो बंद पडला. आता दोघेही दुसर्‍या ऑर्केस्ट्रामध्ये गाणी म्हणतो अन् संसार चालवतोय. खरंतर, संसार मी चालवते. विनोद दारू आणि जुगारात पैसे उडवतो. मला एक मुलगी झाली, पण तिच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत. दोन वर्षांपूर्वी तिने पळून जाऊन लग्न केलं. एकंदरीत तिच्या आईने केलं तेच तिने केलं… आता आहे मी नागपूरात, संसार ओढतेय. पण मनोहर असा एक दिवस गेला नाही त्यादिवशी तुझी आणि दादाची आठवण नाही आली. खरंतर तुम्ही दोघेही देवमाणसं. पण विनोदच्या नादाला लागले आणि आपले संस्कार विसरले. आता दादा बरा झाला की, दादाची माफी मागायची आहे आणि दादाला उतारवयात माझ्याकडे न्यायचे आहे.’’

    मी वाचायचे सोंग करत अरुणाचे बोलणे ऐकत होतो. मी काहीही उत्तर देत नाही, हे पाहून अरुणा म्हणाली, ‘‘मनोहर, काय तरी बोल रे! मी तुला दिलेल्या त्रासाबद्दल माझा धिक्कार कर, पण काही तरी बोल. तुझ्या अबोल्याचा मला फारफार त्रास होतोय.’’

    ‘‘अरुणा, काय बोलू? माझ्या आयुष्यातील सर्वात आदरणीय व्यक्ती म्हणजे वैद्य सर. पण त्यांनीच हाताला धरून मला घराबाहेर काढलं… तेही काहीही कारण नसताना. एवढी मानहानी, एवढं दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये. तू विनोदला वाचवायला गेलीस, पण माझा बळी दिलास. गेली पंचवीस वर्षे ते दुःख काळजात रुतलंय, त्याने माझं काळीज रक्तबंबाळ झालंय आणि जगातला कोणीही डॉक्टर किंवा कोणतेही औषध ते बरे करू शकणार नाही. अरुणा असं का केलंस तू? माझेच नाव का घेतलेस? मी खेड्यातला गरीब मुलगा होतो म्हणून? की माझा तिरस्कार करत होतीस म्हणून?”

    “तसं नाही रे मनोहर. पण त्या घाबरलेल्या अवस्थेत तुझं नाव आलं खरं…” हे वाक्य संपायच्या आधीच नर्स आत आली. तिने मॉनिटर बघून पल्सरेट, ब्लडपे्रशर चेक केलं आणि पेशंटला विश्रांती हवी आहे, तुम्ही बाहेर बसा, अशी खूण केली. मी आणि अरुणा बाहेर आले. तर, माझा चुलत भाऊ जगदिश आणि त्याची पत्नी सरांना भेटायला आली होती. मी त्याला सरांच्या तब्येतीबद्दल सांगत राहिलो… अरुणाला खूप काही बोलायचं होतं पण ते अर्धवट राहिलं.

    सरांच्या आजारपणाची बातमी त्यांच्या विद्यार्थ्यांत, सहकार्‍यांत पसरली… तसे अनेकजण हॉस्पिटलमध्ये येत राहिले. सायंकाळपर्यंत सरांच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. सर डोळे उघडून पाहात होते. कोल्हापूरमधील काही मित्रमंडळी त्यांना भेटायला आली म्हणून मी त्यांना घेऊन सरांच्या बेडकडे आलो. सरांनी सर्वांच्या चेहर्‍याकडे पाहता पाहता माझ्या चेहर्‍याकडे पाहिले आणि क्षणात त्यांच्या चेहर्‍यावर ओळख दिसू लागली. “मनोहर…” असे ते पुटपुटले. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांचा थरथरता हात हातात घेतला. एवढी इतर मंडळी असताना सुद्धा सर माझ्याचकडे पाहत होते, काहीतरी बोलू इच्छित होते. पण व्यवस्थित शब्द बाहेर पडत नव्हते. मी आता सरांच्या शेजारी बसूनच होतो. अधून मधून अरुणा बेडजवळ येत होती, बाहेर जात होती.

    रात्री डॉक्टर पुन्हा राऊंडला आले. सरांच्या तब्येतीविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. उद्यापासून दोन दिवस हॉस्पिटलमधील फिजिओ ट्रिटमेंट देईल, त्यानंतर घरी गेल्यावर फिजिओला बोलावून ट्रिटमेंट घ्या. आता फारशी काळजी करण्याची गरज नाही, असा सल्ला त्यांनी दिला.

    दुसर्‍या दिवशी सकाळी ते तरतरीत दिसत होते. मी त्यांना भेटायला गेल्यावर मला आपल्या शेजारी बसण्याची खूण केली. मी त्यांच्या शेजारी बेडवर बसलो. अचानक सर हळू आवाजात बोलू लागले… “मनोहर, मला क्षमा कर. मी फार मोठी चूक केली.” माझ्या कानात सरांचे हे शब्द पडताच मी सरांचे हात हातात घेतले. मी म्हणालो, “सर बोलू नका, मला सर्व समजले. तुम्ही विश्रांती घ्या. व्हायचे ते झाले.”

    “नाही रे मनोहर, मी तुझा अपराधी आहे. अरुणाच्या सांगण्यावरून मी तुझ्यावर संतापलो. खरंतर, शहानिशा करून तुझ्यावर आरोप करायला हवे होते.’’

    ‘‘तुम्हाला विश्रांती हवी सर…’’

    ‘‘मला बोलू दे मनोहर, तुझ्यासारखा आदर्श विद्यार्थी मला पुन्हा मिळाला नाही. पण माझ्या नालायक बहिणीवर विश्वास ठेवून तुला दुखवलं मी.’’

    ‘‘झालं ते झालं. शेवटी तुम्हाला सत्य कळलं, हे महत्त्वाचं. तुमच्या मनात माझ्याबद्दल काही राहता नये. कारण माझ्या आयुष्यात तुमचे माझ्यावरील उपकार कधीही न विसरण्यासारखे…’’

    हेही वाचा – अरुणाचा आरोप अन् वैद्य सरांचा संताप…

    ‘‘अरुणाने फसवलं रे मला, आपल्या याराचे नाव न घेता तुला पुढे केला आणि शेवटी याराबरोबर पळून गेली ती काल दिसली. एवढ्या दिवसात आपल्या दादाचं काय झालं? याची साधी चौकशीपण केली नाही तिने.’’

    ‘‘जाऊ दे सर, पण आता तुम्हाला आपल्याबरोबर नागपूरला नेणार आहे.’’

    सर चिडून म्हणाले, ‘‘ती भले नेईलही, पण तिच्याबरोबर कोण जाईल? मनोहर, माझी बहीण माझ्या मनातून पार उतरली रे.’’

    ‘‘पण सर, मग तुम्ही…’’

    ‘‘मी तुझ्याबरोबर येणार मनोहर. तुझ्या एवढा मला जवळचा कोण आहे?’’

    ‘‘सर, खरंच तुम्ही माझ्याबरोबर येणार?’’

    ‘‘तुला काही अडचण आहे का?’’

    ‘‘नाही सर, काहीच नाही. खरंतर तुम्ही माझ्या मनातलं बोलत आहात. तुम्ही माझ्याबरोबर या सर. तुमचं पुढील आयुष्य किती आनंदात जाईल पहा. मी लग्न केलं नाही, पण तुमच्या आशीर्वादाने भारत सरकारकडून मोठ्ठं घर, नोकरचाकर सर्व काही आहे आणि निवृत्तीनंतरही मोठ्या घराची व्यवस्था करून ठेवली आहे. चांगली लायब्ररी आहे, म्युझिक रूम आहे, बाग आहे. पण घरात मोठं कोण नाही याची खंत आहे. सर, तुम्ही मला हवे आहात. माझ्या आईवडिलानंतर तुम्हीच माझे आईवडील व्हा, मार्गदर्शक व्हा.’’

    सरांनी माझ्या हातावर डोकं ठेकवलं.

    चार दिवसांनी मी इंडिगो विमानात बसलो होतो. विमानात दिल्लीला जाण्यासाठी अनेक व्हीआयपी, बिझनेसमन, श्रीमंत माणसे बसली होती. पण मला वाटते आज या विमानात सर्वात श्रीमंत मीच आहे… कारण माझ्या हातात सरांचा हात आहे. सर माझ्या समवेत दिल्लीला येत आहेत, कायमचे.

    समाप्त


    मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn