Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»जोशी सर… भलेपणाचा वसा
    ललित

    जोशी सर… भलेपणाचा वसा

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 12, 2025Updated:March 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, गजू, गजूशेठ, जोशी मास्तर, माणुसकी, मोची, चर्मकार,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बूट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने मान वर केली… समोर एक वयस्कर गृहस्थ उभे होते.

    “अरे, ही चप्पल शिवायची आहे…”

    समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. विचार करता करता त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली.

    “तुम्ही जोशी सर ना?” त्याने विचारलं.

    “हो. तू मला कसा ओळखतोस?”

    “सर, मी गजानन. गजानन लोखंडे. झेडपीच्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हाला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे…”

    “बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये…!” जोशी सर त्याला निरखत म्हणाले.

    “असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की, तुमच्या लक्षात राहीन. शिवाय, आम्ही नेहमी मागच्या बाकावर बसणारे… कधीही प्रश्नांना उत्तरं न देणारे… ” गजू हसतहसत म्हणाला.

    “बरं बरं. पण तू हा व्यवसाय का…?”

    “सर, हा आमचा पिढीजात व्यवसाय! आजोबा, वडील दोघंही हेच करायचे. दहावीत सुटलो, पण तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे शिक्षण सोडून गेली चार वर्षे हेच काम करतोय.”

    “काय झालं वडिलांना?

    “सतत दारू पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात…”

    “ओह! आणि तुझे भाऊ?”

    “दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत. शिकताहेत. आई अशिक्षित आहे.”

    “अच्छा. पण मग या व्यवसायात एवढ्या सगळ्यांचं व्यवस्थित भागतं का?”

    “पोटापुरतं मिळतं सर…”

    जोशी सर विचारात गढून गेले. गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही, नाही म्हणत असतानाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून ते निघून गेले.

    काही दिवसांनी ते परत आले. गजूला म्हणाले, “अरे, गजू माझ्या मापाचा एक बूट तयार करून देशील?”

    गजू तयार झाला. त्याने माप घेऊन दोन दिवसांत बूट तयार करून दिला. सरांना तो जोड आवडला. त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले. गजूला खूप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते!

    हेही वाचा – कडक उन्हाच्या झळा अन् माणुसकीचा ओलावा

    आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बूट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले. बरेचसे शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी होते. सगळे जोशी सरांनी पाठवलंय असं सांगायचे. कोणतीही घासाघीस न करता गजू म्हणेल ते पैसे द्यायचे. ब्रँडेड चपला-बूटांची मोठमोठी दुकानं सोडून ते आपल्याकडे चपला-बूट बनवतात याचं गजूला आश्चर्यही वाटायचं आणि आनंदही व्हायचा…

    काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले, “गजू तुझ्या हातात कला आहे. सगळ्यांना तू बनवून दिलेल्या चपला, बूट आवडताहेत. तू असं का करत नाहीस, इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साइजचे डझनभर चपला-बूट ठेवले तर गिऱ्हाईकांना तयार होईपर्यंत थांबावं लागणार नाही…”

    “सर कल्पना चांगली आहे, पण त्याला दहा, पंधरा हजार लागतील. तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ…”

    “हरकत नाही. मी देतो तुला. पण मला तू ते सहा महिन्यांत परत करायचे. चालेल?”

    गजू तयार झाला. सरांनी पंधरा हजार दिल्यावर आठवड्यातच तो बसायचा, तिथं टपरी उभी राहिली. महिना – दीड महिन्यातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजाराचा नफाही हातात पडला. जोशी सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले. त्यांनी ते त्याला परत केले.

    “मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती. सहा महिन्यानंतरच मला परत कर, तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर. स्टाँक तयार करून ठेव. आता लग्नसराई जवळ येतेय… चांगला सेल होईल बघ तुझा!”

    सरांनी दिलेल्या कल्पनेने गजूचा आता उत्साह वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरुवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खूप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला…

    सहा महिन्यांनी सर आले. गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.

    “सर, खूप चांगलं चाललंय. पण आता पुढं काय करायचं?”

    “गजू, आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलंय दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. दुकानाचा मालक माझा विद्यार्थीच आहे. तो तुझ्याकडून भाडं कमी घेईल आणि हो! स्माँल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. एमआयडीसीमध्ये फॅक्टरी टाकून दे!”

    “काय? फँक्टरी?” फॅक्टरीच्या नावानेच गजूला कापरं भरलं… “सर, मला जमेल का? मला त्यातलं काही कळत नाही. नुकसान झालं तर आहे तो पैसाही गमवून बसेन. त्यापेक्षा जे चालू आहे तेच काय वाईट आहे?”

    हेही वाचा – कुंडलीयोग अन् विधिलिखित!

    “आहे त्यात समाधान मानलं तर, उद्योजक कसे तयार होणार? सगळं जमेल गजू… काही नुकसान होत नाही आणि मी आहे ना नुकसान झालंच तर! ती माझी जबाबदारी. मग तर झालं?” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.

    गजू त्यांचे पंधरा हजार त्यांना देऊ लागला. त्यांनी ते घेतले नाहीत.

    “तू प्रामाणिकपणे परत करतो आहेस, त्यातच मला आनंद आहे. राहू दे तुझ्याजवळच. तुझ्या कामास येतील. मला गरज लागली तर मागून घेईन…” ते म्हणाले

    गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.

    “सर, खूप करताय माझ्यासाठी…”

    “अरे, ते माझं कर्तव्यच आहे,” त्याला उठवत ते म्हणाले, “माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत, व्यावसायिक आहेत. तूच एकटा मागे रहावा, हे मला कसं बरं वाटावं?”

    गजूच्या डोळ्यात पाणी आलं.

    दोन-तीन वर्षांत गजू खूप पुढे गेला. फॅक्टरी वाढली. एकाची तीन दुकानं झाली. त्याचा माल आता आजूबाजूच्या जिल्ह्यातही जाऊ लागला. गजूचा गजानन शेठ झाला. झोपडपट्टीतून तो थ्री बीएचके फ्लॅटमध्ये राहायला गेला. भाऊ-बहिणी चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो जोशी सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आईही वारली.

    इकडे जोशी सरांना निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती. सर आता थकले होते. इंग्लंडमध्ये नोकरी करणाऱ्या त्यांच्या मुलाने तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच ऑस्ट्रेलियात स्थायिक होती. त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.

    एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांची मुलगा, मुलगी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. ते येण्याअगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच, शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.

    सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला आणि मुलीने ऑस्ट्रेलियाला चलण्याचा खूप आग्रह केला, पण सरांची मायदेश सोडायची तयारी नव्हती. शेवटी सरांना इथेच सोडून ते निघून गेले.

    सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरू झालं. त्यांची तब्येतही अधूनमधून बिघडायची. ते गजूला बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता.

    एक दिवस सरांनी वृद्धाश्रमात जायची तयारी केलीय, हे ऐकून गजू बायकोला घेऊन सरांच्या घरी पोहचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.

    “सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुमच्यामुळेच मला आज समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख मिळाली आहे. तुम्ही नसता तर, आजही मी त्या बाजारात चपला-बूट शिवत बसलो असतो… सर, आज मला अजून एक मदत कराल?”

    “अरे, आता तुला मदतीची काय गरज? तू आता खूप मोठा झालाहेस. बरं ठीक आहे, सांग तुला काय मदत हवी आहे?”

    “सर, माझे वडील व्हाल?”

    त्याच्या जगावेगळ्या मागणीने सर स्तब्धच झाले. मग म्हणाले,

    “अरे वेड्या, मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय!”

    “हो ना! तर मग आता मला मुलाचं कर्तव्य करू द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं, अशी माझी इच्छा आणि तुम्हाला विनंती आहे…”

    गजू हात जोडत म्हणाला.

    “अरे, पण तुझ्या बायकोला विचारलं का? आणि तुझे भाऊ-बहीण तयार होतील का?”

    “सर, तिला विचारूनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर, तिलाही आनंदच होणार आहे. शिवाय, पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की! भावा-बहिणीचाही काही प्रश्न नाही. त्यांना तुमच्याबद्दल आदरच आहे…”

    “बघ बुवा. म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर, तुलाच माझं सर्व करावं लागेल!”

    “मुलगा म्हटलं की, ते सगळं करणं आलंच, सर! तो सारासार विचार करूनच मी आलोय…”

    सर विचारात पडले. मग म्हणाले, “ठीक आहे, येतो मी पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाहीस.”

    “मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो, तुम्हालाही तेच म्हणेन!”

    सर मोकळेपणाने हसले.

    “अजून एक अट. तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची…”

    गजूला गहिवरून आलं. त्यानं सरांना मिठी मारली. दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते.


    (ही कथा माझ्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील आहे.)

    मोबाइल – 9209763049

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn