Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»इतिहासाशी जडले नाते…
    ललित

    इतिहासाशी जडले नाते…

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 28, 2025Updated:March 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, इतिहास, इतिहास अभ्यासक, ऐतिहासिक नोंदी, ऐतिहासिक दस्तावेज, ऐतिहासिक व्यक्ती, इतिहासकालीन साधने, History, historian, historical records, historical documents, historical figures, historical tools
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सौरभ वैशंपायन

    इतिहास अभ्यासक

    जगप्रसिद्ध अमेरीकन संशोधक आणि अत्यंत ज्येष्ठश्रेष्ठ इतिहासकार विल ड्युरांट आणि त्यांची पत्नी आणि नंतरची सहलेखिका एरियल ड्युरांट यांनी आपल्या आयुष्यातली किमान 30 वर्षे फक्त वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करण्यात, वेगवेगळे साहित्य, लेख, ताम्रपट, वस्तू, हस्तलिखिते, पोथ्या, कथा वगैरे जमवण्यात घालवली. मग एक एक करत जगभरातील संस्कृतींवरती अवाढव्य ग्रंथ लिहिले. विल ड्युरांटचे फक्त ‘History of civilization’चेच 11 खंड आहेत. ते त्यांनी 1935 ते 1975 या 40 वर्षांच्या काळात लिहिले आणि प्रसिद्ध केले. 20 इतर ग्रंथ आहेत; त्यापैकी पाच ग्रंथ तर त्याच्या मृत्यूपश्चात तब्बल दोन दशकांनी प्रसिद्ध केले गेले. सांगायचा मुद्दा असा की, लोक आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात संशोधनापोटी! त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना – इतिहास हा समुद्र आहे; समुद्र पिऊन संपवून टाकू म्हणणार्‍या टिटवीच्या चोचीत असे कितीसे पाणी मावणार? याच विचाराने त्याला हात घालावा. आपण जितके वाचू त्याच्या पलीकडे पूर्णतः अस्पर्शित असे हजारपट उरलेले आहेत, याची जाणीव सतत ठेवावी.

    इतिहास हा फसवा असतो. विल ड्युरांटच्या ‘The lesson of History’ची प्रस्तावनाच इतिहासवाचकांसाठी गीता आहे. त्यात ते म्हणतात – “आपण हे सगळं का करतोय? त्यातून आपल्या हाताला काय लागणार आहे? पराक्रमी राजांच्या दु:खद मृत्यूच्या घटना? इतिहासातून मनुष्य स्वभावाबाबत तुम्हाला असं काय वेगळं मिळतं, जे रस्त्यात चालणार्‍या कुणाही भणंगाला एकही पान न वाचताच समजू शकतं?…” एका ठिकाणी ते चक्क ‘History is non-sense’ असं म्हणतात… “To begin with, do we really know what the past was? what actually happened? or is history “a fable” not quite “agreed upon”? Our knowledge of any past event is always incomplete probably inaccurate, beclouded by ambivalent evidence & biased historians, & perhaps distorted by our own patriotic or religious partnership. “most history is guessing, & the rest is prejudice.” विल ड्युरांट यांनी फार ओघवत्या शैलीत हे सगळं लिहिलं आहे. जमल्यास नक्की मिळवून वाचा.

    आपल्याकडे इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी देखील इतिहासाचा अभ्यास कसा करावा याबाबत फार काटेकोरपणे लिहिले आहे. “अस्सल कागदाचा एक चिटोराही समस्त बखरीं आणि इतर साधनांची मते हाणून पाडू शकतो!” इतक्या स्वच्छ शब्दांत त्यांनी अस्सल साधनांचे महत्त्व विषद केले आहे. म्हणून अस्सल साधने मिळतील तितकी मिळवण्याचा प्रयत्न करावा. यातही प्रथम दर्जाची, दुय्यम आणि तृतीयक असे गट पडतात. शक्य तितक्या समकालीन साधनांवरती जोर देऊन इतिहास मांडता येतो. तुम्ही त्या काळापासून जितके दूर सरकता तितका गोंधळ वाढत जाणे, असलेली माहिती नष्ट होणे, नसलेली माहिती घुसवली जाणे हे प्रकार फार सर्रास घडतात. समकालीन साधनांतही पदरी ठेवलेले लेखनिक, भाट त्या त्या घराण्याची वाहवा करतानाच दिसतात. म्हणून, एकाच घटनेबाबत स्वकीय – परकीय काय म्हणतात त्यातले योग्य – अयोग्य काय, हे समजून घेण्याची तयारी हवी. अनेकदा आपल्याला अप्रिय उल्लेखही सापडतात, अनेकद धक्कादायक माहिती हाताला लागते. ती स्वीकारायची तयारी हवी… निदान नवीन पुरावे समोर येईपर्यंत तरी! नवीन विश्वासजन्य पुरावे समोर आले तर, ते स्वीकारावेत, आधीचे मत बदलण्यात कमीपणा वाटून घेऊ नये.

    इतिहास वाचताना कधी अंगावरती गुलाबपाणी शिंपडलं जात तर, कधी कधी चिखलही. इतिहास दचकवणाराही असू शकतो. एखादी व्यक्ती बघता बघता नायक अथवा खलनायक बनू शकते. तरीही कुठलीही व्यक्ती संपूर्णत: एकाच रंगात रंगवून टाकण्याचा मोह शक्य तितका आवरावा. बहुतांश प्रत्येक व्यक्ती आणि घटनेत चांगले तसेच वाईट अशा दोन्ही बाजू असतातच. व्यक्ती अथवा साम्राज्यांची बलस्थाने आणि कमकुवत बाजू नोंद करून आणि मान्य करून पुढे गेल्यास डोक्याला आणि पर्यायाने अभ्यास करताना त्रास कमी होतो.

    हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!

    दोन व्यक्तींमध्ये तुलना शक्यतो टाळावी खासकरून त्यात एक वा अनेक पिढ्यांचे अंतर असल्यास! कारण दोन व्यक्तींची मानसिक, शारिरीक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक वगैरे अनेक पातळ्यांवरती परिस्थिती सारखी असेलच असे नाही. यातला एखादा पैलू देखील त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व अथवा एखाद्या घटनेचे परिमाण आणि परिणाम टोकाचे बदलू शकतो.

    अजून एक, खास करून भारतीय मानसिकतेसाठी नोंदवावंस वाटतं – चारित्र्य आणि चरित्र एकच समजू नये. बाई-बाटलीचा शौक, रंगेल, इश्कबाज म्हणजे ती व्यक्ती ठार वाईटच हा पूर्वग्रह इतिहासाच्या अभ्यासाचे फार मोठे नुकसान करतो. लेबल लावलं की, विषय संपल्यात जमा असतो. वैयक्तिक आयुष्याचा अभ्यास करताना या नोंदी निश्चितच महत्त्वपूर्ण असतात क्वचित प्रसंगी यातूनच इतिहास घडत असतो, हे देखील मान्य! पण सुरुवातच झापडं लावून करू नये. जमल्यास ऐतिहासिक व्यक्तीचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य वेगळं करून अभ्यासावं.

    इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ रक्ताचे पाट आणि लढाया नव्हेत. ‘सामान्यांचे आयुष्य हाच इतिहासाचा विषय असतो,’ असे टॉलस्टॉयने म्हटले ते उगाच नाही. इतिहासात अवघं जग सामावलं आहे. इतिहासात अगणित विषय आहेत. तरी एखाद्या व्यक्तीच्या चरित्रापासून ते महायुद्धासारख्या जगड्व्याळ विषयापर्यंत काहीही असू शकतं. उदा. एखादा मानवसमूह अभ्यासासाठी घेतला तरी त्यावर तत्कालीन भूगोल, हवामान, राहणीमान, सामाजिक, आर्थिक, लष्करी, धार्मिक समजूतींचा पगडा अभ्यासावा लागतो. या कसोट्यांवरती घासून तो मानव समूह किती प्रगत होता, हे समजू शकतं. इतिहासाचा अभ्यास करताना घडून गेलेल्या घटनांवरती आपला सद्य कालखंड आणि आपले विचार लादू नयेत. त्यात हमखास तफावत असते. अगदी दोन-तीन दशकांमध्ये देखील सर्वसाधारण समाजमान्यतांमध्ये टोकाचा फरक पडलेला असू शकतो. त्यावेळची समाजमान्यता कशी होती, याची नोंद करून ठेवल्यास इतिहास सुटसुटीत होतो. त्याच्याशी ‘नाही, नाही’ म्हणून झगडत बसण्यात वेळ वाया घालवू नये. नेमकं असं घडलं हा ‘निष्कर्ष’ अथवा असं व्हायला हवं होतं किंवा नको होतं, हे आपले ‘मत’ असू शकतं – ‘हट्ट’ नव्हे. शिवाय, तो निष्कर्ष अथवा मत ही काळ्या दगडावरती रेघ मानून चालू नये.

    इतिहासाच्या अभ्यासात भूगोल, खगोल, हवामान, अन्न, धार्मिक – जातीय प्रथा तसेच परंपरा, कायदा आणि सुव्यवस्था, आर्थिक, सामाजिक आणि लष्करी घडी, पत्रे, पोथ्या, दंतकथा, गाणी, तंत्रज्ञान, वास्तूशास्त्र अथवा वास्तूसंरचना, तत्कालीन शिक्षण पद्धती, दळणवळणाची साधने, भाषा, लिपी, चलन, शेती, करपद्धती, शस्त्रास्त्रे, तत्कालीन विज्ञान असे शेकडो विषय अभ्यासता येतात. आमच्या पूर्वजांकडे हे होतं आणि ते होतं वगैरे म्हणणं अस्मितेचा भाग असू शकतो; त्याने जीवाला बरं वाटतं. पण त्याची कसोटीवर उतरलेली सिद्धता आणि डोळ्यांना दिसणारे अंतिम रूप काय? हा मोठा प्रश्न आहे आणि यावर विचार व्हावा. एखादे ऐतिहासिक साधन समोर धरले तर, त्यातून आपण किती विषय काढू शकतो, याचा विचार करावा. उदा. एक साधे पत्र घेतले तरी, त्यातून त्या दोन व्यक्तींचा एकमेकांशी असलेला संबध, दोघांची सामाजिक अथवा आर्थिक परीस्थिती, वयातील अंतर, धार्मिक समजूती वगैरे आपल्याला शोधक नजरेने बाजूला काढता येतात का? हे बघावे, त्या पत्रातील कालगणना, सही, शिक्के, पत्राची भाषा, मायने, लिपी या तांत्रिकबाबी मेहनत करून आत्मसात केल्या तर, साधने हाताळताना सोपी जातात.

    हेही वाचा – दांडूमारम्मा मंदिर…  वर्षातून फक्त नवरात्रीतच होते देवीची पूजा!

    इतिहास अभ्यासताना ज्योतिषापासून विज्ञानापर्यंत कशालाही त्याज्य अथवा तुच्छ समजू नये, त्याचा समावेश करून घ्यावा. तो इतिहासाकडे बघण्याचाच एक पैलू आहे. ऐकायला गंमत वाटेल, पण नेपोलियनवर फ्रेंचांनी इतका अभ्यास केलाय की, म्हणे एक पुस्तक हे त्याला लहानपणापासून मरेपर्यंत झालेल्या आजारांवरतीच आहे. लोक इथवर इतिहास खणून काढतात, यावर थोडा विचार व्हावा.

    याशिवाय दऱ्याखोऱ्यातून भटकणार्‍या माझ्या मित्र-मैत्रिणींना विनंती… या भटकंती दरम्यान एक कसलातरी छंद जीवाला लावून घ्या, फोटोग्राफी, वनस्पती – प्राणी – पक्षी – कीटक यांच्या नोंदी, भौगोलिक रचना, गड-दुर्गांचे स्थापत्यशास्त्र, पाणी साठवण्याच्या जुन्या सोयी आणि पद्धती, जुन्या कला, गावागावांतून ऐकायला मिळणाऱ्या दंतकथा, कविता, गाणी, लोककथा, परंपरा, त्या त्या भागातले अन्न या आणि अशा विभिन्न गोष्टींपैकी एकाची नोंद करायचा आणि जमल्यास ब्लॉग – सोशल साइट्सवरती त्याबाबतीत लिहिते होण्याचा तरी छंद लावून घ्या. विश्वास ठेवा इतिहास यातूनच जपला जातो… समजतो… उलगडतो. न जाणो तिथला कुणी म्हातारबाबा वळचणीला अडकवलेलं एखादं शे-दोनशे वर्षांपूर्वीच तलवारीचं, भाला, बरच्याचं पातं, एखादा जीर्ण कागद, जुनाट वस्तू, नाणं काढून तुमच्यासमोर ठेवेल आणि सुखद धक्का देईल किंवा तुमच्या एखाद्या झाडा-पाना-फुलाच्या अथवा प्राणी-पक्षी-कीटकाच्या नोंदीने/ फोटोने निसर्गाचा इतिहास उलगडला जाईल. तुम्हालाच नाही तर, या विषयांचा अभ्यास करणार्‍यांसाठी तुमची एक नोंद अथवा फोटो हा घबाड मिळाल्याचा आनंद देऊ शकतो.

    थोडक्यात काय? तर इतिहास फार सुरेख आहे. त्यावर कुठलाही पूर्वग्रह न ठेवता प्रेम करता यायला पाहीजे बस्स!

    अजून काय लिहिणे? सुज्ञ आहात.


    spayan25@gmail.com

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn