Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»आपली माती, आपली माणसं…
    ललित

    आपली माती, आपली माणसं…

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 20, 2025Updated:March 17, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, जनीबाई, अमेरिका, अमेरिकेचे जीवन, भारतीय जीवन, अंत्यसंस्कार, अखेरची इच्छा, America, American life, Indian life, funeral, last wish
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रदीप केळुस्कर

    जनाबाईला सतीश सांगत होता, “सुरेशचो फोन इल्लो… दहा तारखेक तो मुंबईत उतारतलो, दोन दिवस तेची मुंबईत कामा करून बारा तारखेक चिपी विमानतळावर उतरून हय येतलो, मग परत पंधरा तारखेक तुका घेऊन चिपीवरून मुंबई आणि त्याच रात्री अमेरिकेक जाऊची तिकिटा काढल्यानं तेनी…”

    जनाबाईने डोक्याला हात लावला. “आता या वयात माका अमेरिकेक न्हेता, माका प्रवास जमतलो रे… माजी ऐंशी सरली…”

    “पण तू हय एकटी रावतास, तेची काळजी वाटता तेका, आते…”

    “अरे, पण मी तुज्याकडे रवलंय असतंय, तुजा घर म्हणजे माजा माहेर न्हय! …आणि माजो भाऊस म्हणजे तुजो बापूस अजून हयात आसा ना!!”

    “होय गे आते, पण सुरेश ऐकणा नाय… मी आणि बाबांनी तेका किती सांगलंय, ‘जनीआते हय रवात, तेचा माहेर आसा ह्या… आमच्याबरोबर पेजपाणी खायतं…’ पण तो ऐकणा नाय, तेचा म्हणणा माजी मुला आता एक आणि तीन वर्षांची आसत, तेंका आजी कशी गावतली आणि आईक पण नातवंडाचे लाड करुषे वाटतले नाय?”

    नातवंडाचा विषय निघताच जनीबाई गप्प झाली. कल्पनेने तिच्या डोळ्यांसमोर सुरेशची मुले आली… काय नाव ठेवली, ते ती आठवू लागली… जतीन आणि छोटी ज्युलिया! ज्युलियाचे फोटो सुनेने – कल्पनाने सुरेशच्या मोबाइलवर पाठविलेले. गोबऱ्या गालाची गोरी गोरी आपली नात… तिला वाटतं होते, तिला उचलून घ्यावे… तिची पापी घ्यावी… तिला मांडीवर झोपवावं… तिच्यासाठी अंगाई म्हणावी… आणि तीन वर्षांचा नातू बूट घालून खेळायला जातो. त्याला जवळ घ्यावं… त्याला रामाची, अर्जुनाची, शिवाजी महाराजांची गोष्ट सांगावी… एवढ्या एकाच कारणासाठी तिला अमेरिकेला जावे, असे वाटत होते.

    ठरलेल्या प्रोग्रॅमप्रमाणे सुरेश आला. मग ती दोघं तिच्या माहेरी भावाला, भावजयला, भाच्यांना, सुनेला, त्यांच्या छोट्यांना भेटून आली. माहेरहून बाहेर पडताना जनीला रडू कोसळलं… आता कदाचित ही शेवटची भेट… तिचे भाऊ, वहिनी, भाचा पण रडू लागले. जड पायांनी तिने माहेरच्यांना निरोप दिला!

    दुसऱ्या दिवशी सुरेश आईला घेऊन प्रथम मुंबईला आणि रात्रीच्या विमानाने अमेरिकेस रवाना झाला.

    जनीबाईने विमानाचा प्रवास प्रथमच केला, सुरुवातीला ती घाबरली… पण विमान उडू लागताच ती, तिची श्रद्धा असलेल्या वेतोबाचे नाव घेत होती… मग हळूहळू तिची भीती कमी झाली आणि मग तिला झोप लागली.

    जनी अमेरिकेत पोहोचली. तिच्या मुलाचे सुरेशचे मोठे घर होते… आजूबाजूला मोकळी जमीन… भरपूर पाणी… तिने नातवंडांना जवळ घेतले. छोट्या ज्युलियाला ती आंघोळ घालू लागली… तिला पावडर-कुंकू लावू लागली. तिला झोपवू लागली. जतीन थोडा मोठा… त्याला थोडं-थोडं मराठी येत होतं… ती नातवाला गाणी म्हूणन दाखवू लागली, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगू लागली. थोड्या दिवसांत मुलांना आजीचा लळा लागला. आता मुलं आजीसोबत झोपू लागली. तिची सून कल्पना पण प्रेमळ… ती पण खूश झाली. तिलापण आपले संस्कार करणारे हवे होते… एकांदरीत आई अमेरिकेत आल्याने कुटुंब आनंदीत झाल्याचे सुरेशच्या लक्षात आले.

    हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी

    जनीबाईने मुलाला भाजीचे बियाणे आणायला सांगितले. सुरेशने सुपर मार्केटमधून आणून दिली. सासू-सुनेने मिळून बियाणे पेरले, त्या सुपीक जमिनीत भाजी तरारून वर आली. जनीबाईने फुलझाडेही लावली, काही दिवसांत ती पण जगली.

    सुरेशची बायको कल्पना गुणी स्त्री होती, तशी ती त्यांच्याच नात्यातील! ती नोकरी करत नव्हती… त्यामुळे जेवण, भांडीकुंडी सर्व करत होती. मुलं थोडावेळ आईकडे, पण जास्त आजीसोबत असायची. सुट्टीच्या दिवशी सुरेश आई, बायको, मुलांना घेऊन लांब फिरायला न्यायचा. जनीबाई एवढ्या वर्षांत फिरली नव्हती, तेवढी चार महिन्यांत फिरली!

    सुरेश आणि कल्पनाच्या लक्षात येत होते, आईला अमेरिकेची हवा मानवली! गावात ती सतत उन्हातान्हात कामात असायची किंवा एकटीच असल्याने जेवण करायला टाळाटाळ करायची. पण इथे कायम थंड हवामान आणि पौष्टीक जेवण… शिवाय, नातवंडांची साय… त्यामुळे उजळली होती. सुरेश आणि कल्पना मनात म्हणत होती, आता आईला इथेच ठेवायचे. घरात कोणी मोठे असले की, आपल्याला आणि मुलांना पण आनंद होतो.

    जनीबाई पण खूश होती, मुलाच्या-सुनेच्या घरात कसलाच त्रास नव्हता, पण तिला आपल्या घरची आठवण येई. आपल्या नवऱ्याने स्वतः कष्ट करून बांधलेले घर… आजबाजूची झाडे… घरातील देव… जोडलेली माणसे.. नातेवाईक… भाऊ, वहिनी, भाचा, त्याची मुले आणि तिची श्रद्धा असलेला देव वेतोबा… सकाळी जाग आली की, डोळ्यासमोर वेतोबा… ती त्याला नमस्कार करी. पण आपले थोडे दिवस राहिलेयत, याची तिला कल्पना होती. शेवटचे दिवस मुलगा, सून आणि नातवंडांसोबत काढावेत, असे मनाला बजावत ती जगत होती.

    एके दिवशी ती सकाळी उठली, तेव्हा तिचा मुलगा सुरेश घराच्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहात होता… कल्पना पण त्याच्यासमवेत होती. सुरेश कुणाबरोबर तरी इंग्लिशमध्ये मोठ्याने बोलत होता. कल्पना काळजीत दिवस होती…

    सुरेशचे फोनवरील बोलणे संपल्यावर जनीबाईने विचारले, “काय झाला रे?”

    सुरेश म्हणाला, “या शेजारच्या बंगल्यातील रुसेलची मम्मी गेली, रुसेल बाहेरगावी गेलोवा, तो रात्रीपर्यत येतोलो…”

    “अरे बापरे, म्हणजे तोपर्यत सगळ्यांका वाट बघुक होयी.”

    “छे, अमेरिकेत कोण-कुणाची वाट बघत नाय, रुशेलने म्युनिसिपालटीक फोन केल्यानं, तेंची ॲम्ब्युलन्स येतली आणि बॉडी घेऊन जातली.”

    “अरे, मग जाळतले खय?”

    हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’

    “इकडे जाळनत नाय, पुरतत… ता काम म्युनिसिपालटी करता…”

    “अरे, मग आमच्या देशातील लोक या देशात वर गेलो तर…?”

    “…तर तेका विद्युतदाहिनी असता, म्हणजे आत ठेवला आणि बटन दाबला की, शरीराची राख होता!”

    “मग या देशात लाकडा मिलनात नाय जाळूक?”

    “तेची बंदी आसा… या देशात कोणी मेलो तर, या देशाचे नियम पाळूक लागतात. आपल्या भारत देशासारख्या नाय…”

    जनीबाईच्या डोक्यात गोंधळ उडाला. तिने तिच्या जन्मापासून मेलेल्या माणसाला जाळताना पाहिले होते. या देशात हे सर्व नवीनच! तिच्या पचनी पडणारे नव्हते.

    थोड्यावेळाने तिने मुलाला विचारले, “मग तेचे अस्थी कसे गावातले?”

    “इकडे अस्थी वगैरे काय नसता गे, अस्थी वगैरे आपल्या देशात. माणूस मेलो काय संपलो…”

    “मग तेचा पुढचा सुतक..?”

    “या देशात सुतक कोण नाय पाळणा… कोणाक वेळ नसता… जो तो कामात.”

    “मग अकराव्या.. बाराव्या?”

    “ते विधी भारतात… आपल्या देशात! या देशातील लोक असला काय मानीत नाय…”

    “मग त्या रुशेलची बाकी नातलगा? भाऊ, बहीण, आते, मामा, मामी, भाचे ते येतले मा भेटुक?”

    “सगळे फक्त प्रार्थना करतले चर्चमध्ये… आणि मेसेज पाठवतले दुःखाचे…”

    एकएक गोष्टी ऐकून जनीबाई आश्यर्य करीत राहिली… या देशातील काय या पद्धती! आपल्या देशापेक्षा एकदम उलट!! मग तिने सुरेशला विचारले, “तू त्या रुशेल, भेटाक जातलंस मा?”

    “छे, मी मेसेज पाठवलंय कंडोलन्सचो, म्हणजे आपण श्रद्धांजली म्हणतो तसं…”

    “बस… एवढाच?”

    हे म्हणत असताना शेजारी ॲम्ब्युलन्स आली, त्यातील चार माणसे खाली उतरली… त्यांनी घरात जाऊन बॉडी उचलली… दरवाजा उघडून आत ठेवली आणि ॲम्ब्युलन्स आवाज करत निघून गेली…

    जनाबाई हादरली… अमेरिकेत मरण आलं तर? आपलं वय झालेलं, कधीही वर जायची तयारी हवी आणि मी मेल्यानंतर मला म्युनिसिपलटीचे लोक ॲम्ब्युलन्समधून घेऊन जाणार आणि मला त्या शेगडीत घालणार! आणि माझे अस्थी? त्याचा विसर्जन…? काही नाही! माझा मुलगा तरी असेल काय अंतिम कार्याला? माझी सून… नातवंडे… माझा भाऊ… भावजय… भाचा… सून… शेजारीपाजारी… कोणी म्हणजे कोणी नाही? मी गेल्यानंतर कोणी रडणार नाही! कोण कोणाला भेटायला येणार नाही.. सांत्वन करायला कोण नाही… नुसते मेसेज दुःखाचे.. कसले मेले कोरडे मेसेज! छे छे… माझ्या अस्थी मी या देशात टाकणार नाही… माझ्या अस्थी माझ्या मातीत… माझ्या देशाच्या मातीत… माझ्या माणसात…

    जनीबाई अस्वस्थ होऊ लागली, तिला झोप येईना, जेवण गोड लागेना, नातवंडांना जवळ घेऊन ती शून्यात पाहू लागली, शेवटी तिने धीर करून सुरेशला सांगितले, “सुरेश, माझा वय झाला, आता केव्हाय वर जाऊची तयारी करूंक व्हयी, पण या देशात मराची माझी तयारी नाय.”

    “अगे आई, काय बोलतस तू? आमी आसवं ना तुझ्यासोबत…”

    “जिता आसय तोपर्यत तुमी आसात, मी मेल्यावर तू म्युनिसिपालटीक फोन करून सांगतलंस, ही बॉडी घेऊन जावा म्हणून… त्या रुशेलच्या आईक नेला तसा… माका आसा बेवारशी मराचा नाय आसा! माका माझ्या माणसात मराचा आसा… माजे अस्थी भोगव्याच्या कोंडीत पडात होयेक… थयसून देवबागच्या संगमात विरघळूक होयेत…”

    “आई, काय तरी तुजा? तू एवढ्यात कशाक वाईट गोष्टी बोलतं? तुका मोठा आयुष्य आसा?”

    “नाय बाबा, माजी खात्री नाय, तू माका माज्या भावाकडे पोचव… मी थय आनंदान रवान… मग मेलंय तरी हरकत नाय.. माज्या देशात माज्या मातीत… माज्या माणसात…”

    सुरेश आणि कल्पनाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण जनीबाई काही ऐकेना. आई जेवायची पण बंद झाली, हे पाहून सुरेशने मामांना फोन लावून सर्व सांगितले, त्यांनी आनंदाने तिला इथे घेऊन ये म्हणून कळविले.

    सुरेश आईला घेऊन मामाकडे आला. या घरातील सर्वांनी तिला खूप प्रेम दिले, सुरेशच्या मुलांना आजीची सवय झाली होती, त्यामुळे दरवर्षी ती चौघे भारतात येऊन राहू लागली.

    जनीबाई पुढे पाच वर्षे जगली. लहानशा आजाराचे निमित्त होऊन ती गेली. सर्वजण तिच्यासाठी रडली. तिच्या भाच्याने सतीशने तिला अग्नी दिला. अनेक नातेवाईक, शेजारी, गाववाले भेटून गेले. पाचव्या दिवशी सुरेश, कल्पना अमेरिकेहून आली, तिच्या अस्थी तिच्या इच्छेप्रमाणे भोगव्याच्या कोंडीत सुरेशने विसर्जित केल्या.

    तिचे अकरावे, बारावे सुरेशने केले आणि तिच्या पिंडाला कावळा पटकन शिवला…


    फोन – 9307521152 / 9422381299

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn