Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»आई… रक्ताच्या नात्यापलीकडचे प्रेम!
    ललित

    आई… रक्ताच्या नात्यापलीकडचे प्रेम!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 10, 2026Updated:March 17, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, राज नेहा, राज आई, नेहा आई, नेहा सासू, सासू सुनेचे प्रेम, सासूचे दागिने, सासूचा दुर्धर आजार, आईची ममता, रक्तापलीकडचे नाते, रक्तापलीकडची माया,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिलीप कजगांवकर

    “बेटा लाडू खातोस का?”

    हे ऐकून मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न असलेला राज क्षणभर हरवून गेला, कारण त्या आवाजात आईची माया होती… राज इंटरव्ह्यूसाठी ट्रेनने कोल्हापूरहून मुंबईला निघाला होता. त्याच्या समोरील सीटवर बसलेल्या काकूंनी डब्यातून लाडू काढले आणि त्या त्याला विचारत होत्या, “बेटा लाडू खातोस का?”

    “हो… नको नको,” राज गडबडला.

    “घे रे पोरा, साजूक तुपाचे आहेत आणि मी स्वतः केले आहेत,” म्हणत अगदी मायेने त्यांनी राजला लाडू दिला.

    “काकू खूपच छान,” म्हणत राजने दोन लाडू फस्त केले.

    राजचे नुकतेच लग्न झाले होते आणि तो कोल्हापूरच्या एका छोट्या कंपनीत काम करत होता. मुंबईतील एका मोठ्या कंपनीची जाहिरात होती, काम चांगले होते, पगारही चांगला होता आणि म्हणूनच राज त्याचे नशीब आजमावण्यासाठी मुंबईला निघाला होता.

    वयाची साठी पार केलेल्या काकू पारशी होत्या. अनेक वर्षे मुंबईत राहिल्यामुळे अतिशय शुद्ध मराठी बोलत होत्या. गोरा वर्ण, मध्यम उंची, स्थूल बांधा, बॉब कट, प्रयत्नपूर्वक काळे केलेले केस, हसरा आणि मोहक चेहरा… मुंबईला गाडीतून उतरताना “बेस्ट ऑफ लक बेटा,” म्हणणाऱ्या काकूंना राजने वाकून नमस्कार केला.

    हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!

    राजचा इंटरव्ह्यू छान झाला. एकूण चार उमेदवार होते आणि त्यांच्यात राज सरस ठरला. राजला नोकरी मिळाली, पगारही मनासारखा मिळाला. आता चिंता होती ती राहण्याच्या जागेची. परवडणारे घर मिळणे ही मुंबापुरीतील सर्वांत गंभीर समस्या, आता राजला भेडसावत होती. राज घराच्या शोधात भटकत असताना अचानक आवाज आला, “बेटा.”

    हो, त्या गाडीतल्या काकूच होत्या.

    “बेटा, कसा आहेस? तुला ती नोकरी मिळाली का? इकडे काय करतोयस?” काकूंनी विचारले.

    “काकू, नोकरी मिळाली. आता मी घर शोधतोय, परंतु खिशाला परवडणारे घर मिळत नाही,” राज केविलवाण्या स्वरात म्हणाला.

    “चल, मी तुला एक घर दाखवते,” म्हणत काकूंनी राजला एका छानशा सोसायटीत आणले.

    “काकू, इथे घर खूपच महाग असेल. मला परवडणार नाही,” राज म्हणाला. केवळ काकूंच्या आग्रहामुळे राज घर बघायला तयार झाला.

    घर खूप प्रशस्त होते. तीन बेडरूम, मोठा हॉल, किचन आणि दोन मोठ्या बाल्कन्या. एवढ्या मोठ्या घरात राहत होत्या काकू एकट्याच! त्यांना एकाकी आयुष्याची सवय लागली होती, पण त्यांची मायेची भूक अजूनही अपुरी होती…

    “तू आणि सूनबाई इथेच राहायचे! आणि हो, मुलगा आणि सूनेकडून कोणी भाडे घेतं का? भाडे अजिबात द्यायचे नाही, पण प्रेम मात्र भरपूर द्यावे लागेल. आहे ना कबूल?” काकूंनी प्रेमाने विचारले.

    राजसाठी हे अनपेक्षित होतं. केवळ ट्रेनमधील ओळख आणि काकू इतकं करायला तयार होत्या. काही वेगळा हेतू तर नसेल ना? आपण कशात फसणार तर नाही ना?… पण राजकडे सध्या तरी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. राजने नेहाला सविस्तर सांगितले. “काहीच हरकत नाही,” म्हणत नेहाने आनंदाने होकार दिला. पुढच्याच आठवड्यापासून राज आणि नेहा काकूंसोबत राहू लागले. मनमिळावू आणि प्रेमळ नेहाने काकूंना आपलेसे केले. काकूंना “सून” नव्हे तर “मुलगी” मिळाली.

    शिकल्या-सवरलेल्या नेहाने नोकरी शोधायला सुरुवात केली. लवकरच नेहाला नोकरी मिळाली. नेहा ऑफिसला जाण्याआधी बरीचशी कामे करून जायची. पण नेहाचा सहवास कमी झाल्याने काकू थोड्या नाराज झाल्या. हळूहळू नेहा घरी नसण्याची त्यांनी सवय करून घेतली.

    शनिवारी, रविवारी सकाळी फिरायला जाणे, पत्ते खेळणे, कॅरम खेळणे, पिक्चर बघणे, संध्याकाळी चौपाटी किंवा गार्डन आणि रात्री बाहेर जेवण… काकूंच्या एकाकी जीवनाला नवा अर्थ प्राप्त झाला. आपले कुणीतरी आहे ही भावना निर्माण झाली, जगण्याची उमेद वाढली.

    नेहाने घराची जबाबदारी स्वीकारली. नेहा आणि राजच्या एका बेडरूममधील राज्याची व्याप्ती संपूर्ण घरभर पसरली, अर्थात काकूंच्या संमतीनेच!

    राज कंपनीच्या कामासाठी तीन महिने बंगळुरूला गेला. नेहाची जबाबदारी काकूंवर आणि काकूंची जबाबदारी नेहावर सोपवून. नेहाची आणि काकूंची जवळीक अजूनच वाढली. नेहा काकूंची सर्वतोपरी काळजी घेत होती. त्यांच्या आवडीनिवडी जपत होती. विकेंडला कधी नेहाच्या मैत्रिणींकडे जाणे, कधी जवळपासच्या पिकनिक स्पॉटला भेट तर कधी घरीच मनसोक्त गप्पा रंगत. आई–मुलीचे नाते अजून बळकट झाले.

    अतिशय सुंदर आणि देखण्या नेहाचा दोन-तीन दिवस पाठलाग करणाऱ्या तरुणाला काकूंनी चांगलेच खडसावले होते. नेहाला घरी यायला रात्री उशीर होणार असल्यास काकू तिला घ्यायला जात असत. काकूंमुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरात नेहा पूर्णपणे सुरक्षित होती आणि त्यामुळेच राज निश्चिंत होता.

    नेहाला तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाताना काकूंनी त्यांचे हिऱ्याचे महागडे दागिने दिलेत. घरी आल्यावर नेहाने दागिने काढून काकूंकडे दिले.

    “नेहा, अगं तुझ्याकडेच असू दे दागिने,” काकू म्हणाल्या.

    “काकू, नको नको. मला लागले तर मी परत मागेन, परंतु इतके किमती दागिने तुम्ही तुमच्याकडेच सुरक्षित ठेवा,” नेहाने सांगितले.

    “नेहा, अगं काल दागिने कुठे ठेवलेस तू?” दुसऱ्या दिवशी काकूंनी विचारले.

    “काकू, मी तुम्हालाच दिलेत ना,” नेहा म्हणाली.

    “हो, आठवतं मला. असू देत, असू देत. नकळत मी विसरभोळेपणानेच कुठेतरी ठेवले असतील,” समजुतीच्या सुरात काकू म्हणाल्या.

    “काकू, मिळालेत का दागिने?” दुसऱ्या दिवशी नेहाने विचारले. काकूंकडून नकार ऐकून नेहाही घाबरली.

    “नेहा, मला मदत करतेस का? आपण दोघी मिळून शोधूया.”

    तेवढ्यात आलेल्या ऑफिसच्या फोनमुळे नेहा काकूंना मदत करायला पूर्णपणे विसरली.

    नंतरचा आठवडा नेहासाठी धावपळीचा ठरला.

    दोन दिवस पुण्याला सेमिनार, क्लायंट व्हिजिट, मीटिंग्स अगदी घरी आल्यावरही ऑफिसचे फोन. या गडबडीत काकूंचा नवीन चष्मा दुकानातून आणायला नेहा विसरली आणि भरीस भर म्हणून की काय, काकूंचा आवडता डिनर सेट नेहाकडून पडल्याने फुटला.

    आताशा काकूंचं घराबाहेर जाणं वाढलं आणि संध्याकाळीही त्या उशिरा परत येऊ लागल्या. अबोल, उदास, एकाकी राहू लागल्या, चिडचिड करू लागल्या. सतत उघडी असलेली त्यांची बेडरूम हल्ली बऱ्याचदा बंद असायची. रात्री उशिरापर्यंत त्या झोपत नव्हत्या. नेहाने काकूंना विचारल्यावर त्या नेहावरच भडकल्या. काकूंमधील आई आणि आईची ममता हरवली होती. घरातील आनंद आणि चैतन्य लुप्त झाले होते.

    परवा तर कहरच झाला. नेहा ऑफिसमधून घरी आली त्यावेळी काळा कोट घातलेल्या एका माणसाशी काकू बोलत होत्या. नेहा येताच काकूंचा आवाज दबला तरीही “दागिने, घर, पोलीस, वकील, साक्षीदार, राज, नेहा” असे शब्द नेहाने ऐकले. नेहाला काळजी वाटू लागली. काकूंचे दागिने घातल्याचा तिला पश्चात्ताप झाला. नेहाने राजला फोनवर थोडक्यात सांगितले.

    “नेहा, काळजी करू नकोस. मी परवा येतोच आहे,” राज म्हणाला.

    राज दुपारी आला. नेहाने आज रजा घेतली होती. नेहाकडून राजने सर्व माहिती घेतली. दागिने न सापडल्यानेच काकूंचे वागणे बदलले असणार, राजला नेहाचे म्हणणे पटले. काकूंच्या हरवलेल्या दागिन्यांच्या बदल्यात राजची अंगठी, लॉकेट आणि नेहाचे सर्व दागिने—अगदी मंगळसूत्रसुद्धा—काकूंना द्यायचे असे दोघांनी मिळून ठरविले.

    हेही वाचा – समीर अन् अपर्णा… दैव जाणिले कुणी?

    राजने काकूंना फोन केला. काकूंचे फोनवरील बोलणे ऐकून राज खूपच घाबरला.

    काकू म्हणाल्या, “राज, तू आलास हे खूप बरे झाले. मी तुझ्या येण्याचीच वाट पाहत होते. मी थोड्याच वेळात वकील आणि इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन घरी येईन. नीट ऐक, तू आणि नेहा घरातच थांबायचे, अजिबात कुठेही जायचे नाही. तुमच्या दोघांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड तयार ठेवा.”

    राज आणि नेहाची भीती आणि धडधड वाढली.

    थोड्याच वेळात काकू इन्स्पेक्टर साहेब आणि वकील साहेबांना घेऊन घरात शिरल्या. बिथरलेल्या राज आणि नेहाने दागिने एका तबकात ठेवले आणि ते तबक काकूंपुढे धरले.

    “काकू, तुमच्या हरवलेल्या दागिन्यांच्या बदल्यात आम्ही आमचे सर्व दागिने तुम्हाला देत आहोत, अगदी नेहाचे मंगळसूत्रसुद्धा. प्लीज आम्हाला पोलिसांच्या हवाली करू नका. आमच्यावर पोलीस केस झाली तर आमच्या दोघांचीही नोकरी जाईल. आम्ही रस्त्यावर येऊ.”

    नेहाने तर काकूंचे पायच धरले आणि म्हणाली, “काकू, तुम्ही माझ्यावर आईसारखे प्रेम केले आहे. मी शपथ घेऊन सांगते, मी तुमचे दागिने चोरले नाहीत. एक क्षणभर तुम्ही पूर्वीसारखी परत एकदा माझी आई बना आणि आम्हाला पोलिसांकडे द्यायचा निर्णय बदलवा. आई, मी तुझी लेक — तुझ्याकडे प्रथम आणि शेवटची भीक मागते. नाही म्हणू नकोस.”

    पुढच्या काही क्षणांतच नेहाच्या अश्रूधारांनी काकूंचे पाय ओलेचिंब झाले. काकू एक शब्दही बोलल्या नाहीत. सर्वत्र नि:शब्द, जीवघेणी शांतता पसरली होती.

    शांततेचा भंग करीत वकील साहेब म्हणाले, “राज आणि नेहा, तुम्हाला आम्ही कायमचे बंदिस्त करणार आहोत.”

    “सर, प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या. कंपनीतून अॅडव्हान्स घेऊन आणि दोघांचे लॅपटॉप विकून आम्ही अजून पैसे देऊ. सर, वाटल्यास मी तसे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. मी आजच बेंगळुरूहून आलो. थोडासा वेळ द्या सर. आमची अडचण प्लीज समजून घ्या,” राज म्हणाला.

    “राज, आपल्याकडे फार थोडा वेळ आहे. काकूंना एक दुर्धर आजार डिटेक्ट झाला आहे, ज्याच्यावर कोणताही उपाय भारतातच काय पण परदेशातही नाही. त्यामुळे त्या थोड्याच दिवसांच्या सोबती आहेत. काकूंचे दागिने हरवले नव्हतेच. ते दागिने काकूंनी चुकून कपाटात ठेवण्याऐवजी त्यांच्या बॅगमध्ये ठेवले होते. त्या तुम्हाला पोलिसांत देतील असे कसे वाटले रे तुम्हाला? जीवापाड प्रेम करतात त्या तुमच्यावर. नेहा तर त्यांचा जीव की प्राण आहे. अरे, हे घर आणि सर्व मालमत्ता तुमच्या नावावर करायची आहे त्यांना. त्यासाठीच मी आणि इन्स्पेक्टर साहेब येथे आलो आहोत. लवकरच तुम्हाला — आणि विशेषतः नेहाला सोडून जावे लागणार म्हणून त्या मनातल्या मनात खंत करू लागल्या, त्यांची चिडचिड होऊ लागली. नेहाला हे ऐकवले जाणार नाही म्हणून त्या गप्प गप्प होत्या. त्यांचे काही बरेवाईट होण्याआधी तू यावे आणि सर्व काही तुझ्या आणि नेहाच्या स्वाधीन करावे म्हणून तुझ्या येण्याची आतुरतेने त्या वाट पाहत होत्या. मात्र एक लक्षात ठेवा की, काकू आहेत तोपर्यंत आणि त्यानंतरही तुम्हाला इथेच राहायचे आहे, या घराचे मालक बनून… चला, आपण आता फॉरमॅलिटीज पूर्ण करूया. तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड द्या.”

    “आई…” म्हणत नेहाने हंबरडा फोडला आणि ती आईच्या कुशीत शिरली. आईने राजलाही जवळ घेतले.

    “परमेश्वरा, आमचे उर्वरित आयुष्य आमच्या आईला दे,” अशी प्रार्थना राज आणि नेहाने केली. त्या क्षणी रक्ताचं नाही, तर मायेचं नातं खरं ठरलं. तो विलक्षण प्रसंग बघताना काळा कोट आणि खाकी वर्दीलाही अश्रू लपविता आले नाहीत.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn